
राजमुद्रा न्यूज सातारा : काही वर्षांपूर्वी सातारा शहरातील स्टँड परिसरात सुरु असणार्या वारांगणांवर मात करीत काहीजणांनी सातारा शहरातील रंगेल तरुणाईची नाडी ओळखत सातारा शहराच्या हद्दीतच आपल्या खाजगी कुंटणखान्यांना मूर्त स्वरुप दिले आहे. कमी कालावधीत बक्कळ पैसा मिळवणार्या या महाभागांची माहिती सातारा पोलिसांनाच नसावी, याबाबत सर्वसामान्य जनतेमधून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
सातारा शहर आणि उपनगर परिसरातील काही कॅफे आणि लॉजेसवर देहव्यापाराचे अवैध धंदे राजरोसपणे सुरु असून याबाबत अनेक संघटनांनी अनेकदा आवाज उठविला होता. याची पोलीस प्रशासनाने दखल घेत कारवाई देखील केली. मात्र, आता काहीजणांनी लॉजेसवर छापा पडतो, याची जाण ठेवत काही खाजगी घरांचाच आसरा शोधला आहे. या घरांमध्ये वेगवेगळ्या खोल्या काढून काहीजण या हायप्रोफाईल वारांगणांद्वारे आपली छानछोकी भागवत आहेत. काही वेळातच भरपूर माया मिळत असल्याने या व्यवसायामध्ये सातार्यातील अनेकजण उतरले आहेत.
कॅफे आणि लॉजेसवर असे अवैध धंदे सुरु असतानाच सातार्यातील अनेक ठिकाणी घरांमध्येच हा गोरखधंदा सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. पुणे, मुंबई, नाशिक, मिरज आणि कोल्हापूरातून तरुणी व महिला (यातील काही तरुणी तर अल्पवयीनच आहेत) आणून याठिकाणी वेश्या व्यवसाय चालवला जात आहे. सातार्यातील प्रसिद्ध कास पठाराकडील रेव्ह पार्टीतील छमछमचे घुंगरु सातारा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी अजून घुटमळत असुन याची सखोल चौकशी होणार का ? अशी विचारणा आता सातारकर करत आहेत.

सातार्यातील उच्चभ्रू वसाहतीत असे अवैध धंदे चक्क घरांमध्ये ‘स्पा’ आणि मसाज पार्लरच्या माध्यमातुन सुरु असून याकडे केवळ हप्तेगिरीमुळे पोलीस लक्ष देत नसल्याचा आरोप येथील स्थानिक नागरिक करत आहेत. काही तुटपुंजे पैसे संबंधित मुली वा तरुणीच्या हातावर टेकवून यांच्या ‘अक्का’ मात्र अलिशान गाड्यांमधून फिरताना दिसत आहेत. यामुळे सातार्याची संस्कृती बिघडतं चालली आहे. आणि याची पाळेमुळे ही शहराच्या सीमावर्ती भागामध्ये असलेल्या परिसरातील उच्चभ्रु भागापासुन कासपर्यंत पोहचलेली आहेत, अशी दबक्या आवाजात नागरिकांमध्ये चर्चा आहे.
सातारा शहरातील वाढे फाटा परिसरात बाहेरील जिल्ह्यातील मुली-तरुणी आणून त्यांचे फोटो एजंटांद्वारे ग्राहकांपर्यंत पोहचविण्यात येत असून डील फायनल झाल्यास ग्राहकाला संबंधित लॉज किंवा रुमवर पाठवून वेश्या व्यवसाय केला जातो. सातार्यात असा व्यवसाय करणारे जाळे सक्रिय असून, दर दोन दिवसाला बाहेरील जिल्ह्यातून वेगवेगळ्या तरुणी आणून त्यांच्यामार्फत हा वेश्याव्यवसाय चालवला जात आहे. सातारा पोलिसांची विभागणी सातारा शहर, शाहूपुरी आणि तालुका पोलीस स्टेशन अशा तीन पोलीस ठाण्यात झाली असून या हद्दीत वेश्याव्यवसाय चालवणार्यांनी आपले बस्तान चक्क शहर आणि उच्चभ्रू वस्तींमध्ये बसवले आहे. पुणे, मुंबई, नाशिक, मिरज आणि कोल्हापूरहुन तरुणी व महिला आणून त्यांना देहविक्रीसाठी हॉटेल, लॉज, कॅफे आणि बंगल्यांमध्ये पुरविण्यात येत आहेत. सातार्यात चाललेल्या या वेश्याव्यवसायाचा ठावठिकाणा पोलिसांनादेखील माहिती असून लक्ष्मी कृपा होत असल्याने संबंधित ठिकाणी पेट्रोलिंग केले जात नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. संबंधित व्यवसाय चालवणार्यांना परिसरातील सामान्य नागरिकांनी हटकले असता पदरी असलेल्या गुंडांकडून तसेच विनयभंगाची भीती दाखवून त्यांच्यावरच अरेरावीची भाषा करून आमचे पोलिसांशी चांगले संबंध असून कायद्यात अडकवण्याची भाषा हे महाभाग करीत आहेत.
पोलिसांशीच चांगले संबंध असल्याची बतावणी केल्यामुळे सामान्यांचीही कोंडी होत आहे. हे व्यावसायिक देखील चांगलेच तरबेज असून त्यांनी कुंटणखान्याची व्याख्या बदलली असल्याचे समोर येत आहे. बाहेरून मुली आणून ग्राहकांना मोबाईलवर फोटो पाठवून डील फायनल झाल्यास त्यांना लॉजेसवर वा इतरही काही ठिकाणी पाठविण्यात संबंधित लोक आघाडीवर असून तरुणी आणि महिलांना देह व्यापार करण्यास भाग पडून स्वतःचा आर्थिक फायदा करून घेत आहेत. तसेच अधिकाधिक ग्राहक मिळविण्यासाठी त्यांचे एजंट देखील मार्केटमध्ये सक्रिय आहेत.पोलीस अधीक्षक समीर शेख सातार्यात रुजू झाल्यापासून मात्र, अवैध धंदेवाल्यांचा बिमोड करण्याच्या सुचना त्यांनी पोलीस ठाण्यांच्या कारभार्यांना दिल्या आहेत. काही काळापूर्वी समाधानकारक कारवाया होत असताना दिसत असतानाच आता मात्र या कारवायांवर खीळ बसलेली दिसून येत आहे. सातार्यातील काही एजंट हे महिला आणि तरुणींना प्रलोभने वा काही वेळेस दमदाटी करुन देहव्यापार करायला लावून स्वतःचा आर्थिक फायदा करुन घेत आहेत. असे प्रकार करणार्या नराधमांना ठेचण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे असणार आहे. या आव्हानाचा सामना करीत असताना त्यांनी कोणतीही भीडभाड न बाळगता अशा समाजविघातक प्रवृत्तींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी सातार्यातील शांतताप्रीय नागरिक करीत आहेत.

