
सातारा | प्रतिनिधी: एकीकडे कडक उन्हाळ्यामुळे सातारा जिल्ह्यातील अनेक भागांत पाण्यासाठी टाहो फोडला जात असताना, दुसरीकडे सातारा शहरालगतच्या शाहूपुरी हद्दवाढ भागातील गडकर आळीतील समाधिचा माळ, शिवाजीनगर मध्य गेल्या एक वर्षापासून प्रशासनाच्या नाकाखाली लाखो लिटर पाणी वाया जात आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MGP) आणि नगरपालिका यांच्यातील अंतर्गत वादाचा फटका सामान्यांना बसत असून, ‘तहानलेल्या सातारा नगरीत’ पाण्याचा हा अपव्यय पाहून नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
गडकर आळी परिसरातील मुख्य पाईपलाईन गेल्या एक वर्षापासून गळत होती. स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. आता तर ही पाईपलाईन पूर्णपणे फुटली असून, रस्त्यावरून पाण्याचे लोंढे वाहत आहेत. सद्यस्थितीत ही पाईपलाईन दुरुस्त करण्याऐवजी “हे काम आमचे नाही, ते नगरपालिकेचे आहे” आणि “हा भाग अजून पूर्णपणे हस्तांतरित नाही” अशा तांत्रिक कारणांकडे बोट दाखवून एमजेपी आणि नगरपालिका प्रशासन आपली जबाबदारी झटकत आहेत.

लोकप्रतिनिधी फक्त मतदानापुरतेच ?
निवडणुकीच्या काळात गल्लोगल्ली फिरणारे लोकप्रतिनिधी आता गायब झाल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. “बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी” या म्हणीप्रमाणे फक्त आश्वासने देणारे नेते या गंभीर प्रश्नावर गप्प का? असा जळजळीत सवाल गडकर आळीतील रहिवाशी विचारत आहेत. नागरिकांच्या दारातून लाखो लिटर पाणी वाहत असताना त्यांना पिण्यासाठी मात्र पाणी विकत घ्यावे लागत आहे, हे या व्यवस्थेचे मोठे अपयश आहे.
नागरिकांचे सवाल:
गेल्या एक वर्षापासून गळती सुरू असताना प्रशासन झोपले होते का?लाखो लिटर पाणी वाया गेल्याने होणाऱ्या नुकसानीला जबाबदार कोण?लोकांच्या करातून मिळणारा पैसा अशा प्रकारे रस्त्यावर का वाहू दिला जात आहे?
“आमच्या घरात पाणी नाही आणि दारात पाण्याचे तलाव साचले आहेत. हा प्रशासनाचा निर्लज्जपणाचा कळस आहे. जर ही पाईपलाईन तात्काळ दुरुस्त झाली नाही, तर आम्ही तीव्र आंदोलन छेडू.”— स्थानिक नागरिक, गडकर आळी.
आता या प्रश्नावर पालिका प्रशासन व प्राधिकरण लक्ष घालणार की प्रशासन अजूनही एकमेकांकडे बोट दाखवण्यात वेळ मानणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
