सातारा : प्रभाग क्र. 19 मधील ढोणे कॉलनीमध्ये रविंद्रभैय्या ढोणे यांचा वाढता पाठिंबा पाहून काही राजकीय विरोधकांनी समाज हितैषी रविंद्रभैय्या ढोणे यांच्यावर राजकीय सूडबुद्धीने गुन्हा दाखल करण्याचे षडयंत्र रचल्याचे समजत आहे. केवळ सर्वसामान्यांच्या न्यायासाठी फक्त विचारणा करणे, हा गुन्हा ठरतो काय? असा सवाल मात्र यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

याबाबत या सर्व घटनेची पार्श्‍वभूमी तपासली असता एका अपघाताचे कारण यामागे असल्याचे दिसून येते. दि. 14 रोजी एमएच 11 डीओ 9366 या डंपरने बोगदा परिसरात ढोणे यांच्या प्रभागातील तीन मुलींना जोरदार धडक दिली. या धडकेत या तीनही मुली जखमी झाल्या. अपघातानंतर डंपरचा चालक जखमींना मदत करण्याऐवजी घटनास्थळावरुन पळून गेला. डंपरचा मालक धनदांडगा असल्याने तो आपल्याला आपण केलेल्या या गुन्ह्यातून सहिसलामत सोडवेल, ही त्या चालकाची अटकळ असावी. यानंतर स्थानिकांनी या मुलींना खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. बांधकाम मंत्री श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक असलेले रविंद्रभैय्या ढोणे यांनी आपल्या प्रभागातील नागरिक हे आपला परिवार असल्याचे समजून नेहमीच प्रभागात काम केले आहे. प्रभागातील प्रत्येक कुटूंबाच्या दु:खात घरातीलच एक माणूस म्हणून त्यांच्या दु:खांचे अगदी पदरमोड करुन निराकारण केले आहे. अपघात झालेल्या या निष्पाप मुली या ढोणे यांच्याच प्रभागातल्या. त्या अनुषंगाने मुली ज्या हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल होत्या, त्या हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. तेथे पोहोचल्यावर त्यांना सर्व माहिती समजली. मुलींवर योग्य ते उपचार करण्यात यावेत, अशी विनंतीवजा सूचनाही त्यांनी संबंधितांना दिली. तसेच डंपर चालकाची चौकशी केली असता तो पळून गेल्याचेही त्यांना सांगण्यात आले.

धनदांडग्या डंपर मालकाला चालकाने केलेल्या अपघाताची आणि जखमींवर कोठे उपचार सुरु आहेत याची माहिती मिळाली होती. मात्र पैशाने मस्तवाल झालेला डंपर मालक अपघात घडल्याच्या दुसर्‍या दिवशी म्हणजेच दि. 15 रोजी संबंधित हॉस्पिटलला आला. पैशासाठी त्या निष्पाप मुलींवरील उपचार कमी पडायला नकोत म्हणून तेव्हा हॉस्पिटलच्याच परिसरात हजर असणार्‍या रविंद्रभैय्या ढोणे यांनी त्या डंपर मालकाला हॉस्पिटलचे पैसे भरण्याची विनंती केली. मात्र, पैशाच्या गुर्मीत असणार्‍या डंपर मालकाने मुलींवरील उपचाराची चौकशी सोडून ढोणे यांनाच शिव्या देण्यास सुरुवात केली. तेव्हा ढोणे यांचे मित्र, कार्यकर्ते बिथरले. तरीही ढोणे यांनी शांत राहत आणि संयम बाळगत संबंधित डंपर मालकाला पैसे भरण्यास सांगितले. तरीही तो डंपर मालक ऐकण्याच्या मन:स्थितीतच नव्हता. केवळ पैशाच्या धुंदीत त्याच्याबरोबर असणार्‍या गुंडांनी ढोणे यांच्या कार्यकर्ते-मित्रांच्या अंगावर जाण्यास सुरुवात केली आणि पुढे याचे रुपांतर भांडणात झाले.

मात्र, या भांडणातही शांत व संयमी ढोणे यांनी ही भांडणे केवळ सोडविण्याची भूमिका ठेवली होती. मात्र, तरीही समाज हितैषी रविंद्रभैय्या ढोणे यांचे नाव केवळ राजकीय सूडबुद्धीने आणि त्यांची राजकीय कारकीर्द संपविण्याचा हेतू ठेवून विरोधकांनी पोलिसांवर राजकीय दबाव टाकून खोट्या गुन्ह्यामध्ये त्यांना विनाकारण गोवले. विरोधकांनी तर त्यांचे काम केले. मात्र, पोलीस प्रशासनाने त्यांचे कर्तव्य चोखपणे पार पाडले. घटनेची सविस्तर माहिती घेवून शाहूपुरी पोलिसांनी पुढील सोपस्कार पार पाडले. याबाबत प्रभाग क्र. 19 मधील अबालवृद्धांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.

By Admin

You cannot copy content of this page