
सातारा : शिवथर येथील खून प्रकरणाचा उलगडा सातारा तालुका पोलिसांनीअवघ्या बारा तासात केला आहे. या विवाहितेचा खून गावातीलच अक्षयरामचंद्र साबळे वय 28 याने केल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी त्याला रात्री पुणे येथील स्वारगेट मध्यवर्ती बस स्थानक परिसरातून ताब्यात घेतले.चौकशीमध्ये त्याने आपण हा खून केल्याची कबुली दिली आहे. सातारा तालुका पोलिसांनी मोबाईल लोकेशन वरून संशयिताला ताब्यात घेतले.अनैतिक संबंधामधूनच हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
शिवथर, तालुका सातारा येथे सोमवार दिनांक 7 रोजी दुपारच्या दरम्यानअज्ञात व्यक्तींने एका महिलेचा दिवसाढवळ्या गळा चिरून खून केला होता.
याबाबत सातारा तालुका पोलीस स्टेशनला घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मृतक पूजा जाधव हिचे घर शिवथर गावापासून मालगाव रस्त्याला एक किलोमीटर अंतरावर होते.सासू-सासरे शेतामध्ये कामासाठी गेले असता व पती प्रथमेश हा लहान मुलगा शाळेमध्ये सोडून कामाला निघून गेला होता. याचाच फायदा घेऊन दुपारच्यावेळी घरामध्ये कोणी नसताना अक्षय रामचंद्र साबळे वय 28 राहणार शिवथर तालुका सातारा याने घरामध्ये घुसून पूजा जाधव हिचा पहिल्यांदा कटरच्या सहाय्याने गळा चिरुन खून केला व तो तेथून पसार झाला होता. परंतु सातारा तालुका पोलीस स्टेशनने दोन टीम (डिबी पथक) तयार करून मोबाईलच्या लोकेशन वरून संशयीतास पुणे येथील स्वारगेट एसटी स्टँड वरून रात्रीच्या 11ते साडे अकराच्या दरम्यान ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यानंतर सातारा तालुका पोलीस स्टेशनला त्याला आणण्यात आले. खुनाबाबत त्याला माहिती विचारली असता त्याने खून केल्याची कबुली दिली. अक्षय साबळे संबंधित विवाहितेच्या मागे पळून जाण्यासाठी सातत्याने दबाव टाकत होता. तिने नकार दिल्याने त्याने तिचा गळा चिरून खून केल्याचे पोलीस चौकशीत सांगितले.
सातारा अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उप अधीक्षक राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश तांबे, पोलीस उपनिरीक्षक नेवसे, पोलीस उपनिरीक्षक मोर्डे, पीएसआय गुरव, हवालदार मालोजी चव्हाण, ए एस. माने, आर. जी. गोरे, कुमठेकर यांनी खूनाचा तपास करून जलद गतीने यंत्रणा राबवून खुनी ताब्यात घेतला.
