सातारा : याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ‘रागाने बघितले,’ असा गैरसमज करुन युवकांच्या टोळीने शाहूपुरी चौक व शुक्रवार पेठेत अक्षरश: राडा केला. युवकाला मारहाण करत त्‍याच्याकडील सोन्‍याची चैन व कानातील बाली जबरदस्‍तीने चोरली. तसेच टोळक्‍याने घरामोरील दुचाकी कोयत्‍याने फोडली.राज वैराट, अजय बागल, आदित्‍य वाघमारे, सनी भोसले, आयुष मोहिते, सोमा आवळे, रुद्र अवघडे सर्व रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा अशी संशयित आरोपींची नावे आहेत.

ही घटना दि. ३ ऑक्‍टोबर रोजी भरदुपारी ३ वाजता शाहूपुरी चौक व त्‍यानंतर पुन्‍हा रात्री ९ वाजता शुक्रवार पेठेत घडली आहे. तक्रारदार मुलगा अल्पवयीन आहे. त्‍याने दिलेल्‍या तक्रारीत म्‍हटले आहे की, ३ ऑक्‍टोबर रोजी दुपारी शाहूपुरी चौकात तो दुचाकीवरुन निघाला होता. त्‍यावेळी संशयित राज याला असे वाटले की तक्रारदार मुलगा त्‍याच्याकडे रागाने पाहत आहेत. या कारणातून राज याने त्‍याच्या साथीदारासोबत तक्रारदार मुलाला बेदम मारहाण केली. मारहाणीत ५० हजाराची सोन्‍याची चैन व कानातील बाळी संशयितांनी जबरदस्‍तीने चोरली. यावेळी संशयितांनी कोयता दाखवून तक्रारदार मुलाला ‘पाेलीस ठाण्यात तक्रार केली तर हातपाय माेडीन’, अशी धमकी दिली.

या घटनेनंतर संशयित तेथून पसार झाले. ३ ऑक्‍टोबर रोजीच रात्री तक्रारदार मुलगा त्‍याच्या शुक्रवार पेठेतील घरात जेवण करत होता. त्‍यावेळी पुन्‍हा तीच संशयित टोळी त्‍याच्या घरासमोर आली. संशयितांनी शिवीगाळ करत धमकवण्यास सुरुवात केली. त्‍यावेळी संशयितांनी कोयत्‍याने त्याच्या दुचाकीला टार्गेट करत त्‍याची मोडतोड केली. यामुळे अखेर तक्रारदार मुलाने शाहूपुरी पोलीस ठाण्यात जावून तक्रार दिली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक साबळे करीत आहेत.

By Admin

You cannot copy content of this page