प्रतिनिधी (सातारा): महाराष्ट्र शासनाने गुटखा, सुगंधित तंबाखू व माव्याच्या विक्री, साठवणूक आणि वितरणावरकायदेशीर बंदी घातलेली असतानाही जिल्ह्यात अनेक ठिकाणी खुलेआम अवैध गुटखा विक्री सुरू असल्याचा आरोप रक्षक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने केला आहे. याबाबत पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना निवेदन देत तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुशील मोझर यांच्या आदेशाने जिल्हाध्यक्ष मनोज माळी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लहान टपऱ्यांपासून मोठ्या दुकानांपर्यंत गुटखा सहज उपलब्ध होत असून कायद्याची कोणतीही भीती न बाळगता त्याची विक्री केली जात आहे. विशेषतः शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात गुटख्याची विक्री होत असल्याने तरुण व किशोरवयीन मुले व्यसनाच्या आहारी जात आहेत, ही चिंताजनक बाब आहे.

गुटखा हा केवळ आरोग्यासाठी नव्हे तर संपूर्ण जीवनासाठी घातक असून त्याचे दुष्परिणाम कुटुंबीयांनाही भोगावे लागतात. तरीही बंदी असतानाही विक्री थांबत नसल्यामागे कायद्याची प्रभावी अंमलबजावणी न होणे व प्रशासनातील त्रुटीकारणीभूत असल्याचा आरोप केला आहे. तसेच शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावळी तालुक्यात जीवघेण्या अमली पदार्थांचे उत्पादन होत असल्याची बाब लाजिरवाणी असून, यामध्ये सहभागी असलेल्या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणीही केली आहे.

प्रतिष्ठानच्या वतीने अवैध गुटखा विक्री विरोधात विशेष मोहीम उघडली असून, येत्या ७ दिवसांत जिल्ह्यातील अवैध गुटखा विक्री पूर्णतः बंद करावी, अन्यथा रक्षक प्रतिष्ठानचे कार्यकर्ते स्वतः कारवाई करतील, असा इशाराही दिला आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष दस्तगीर बागवान, सांगलीचे जिल्हाध्यक्ष विशाल पवार, जिल्हा संघटक सुशील जाधव, अमोल तांगडे श्रीकांत गडांकुश, यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी व मावळे उपस्थित होते.

By Admin

You cannot copy content of this page