सातारा : आ. शशिकांत शिंदे हे स्वत: मोठे गुन्हेगार आहेत. राज्य शासनाच्या जमिनीत त्यांनी प्रचंड मोठा अपहार केला आहे. ते आजही फरार आहेत. त्यांना जामीन मिळालेला नाही. तसेच आ. शशिकांत शिंदे गणेशोत्सवानंतर दंड थोपटणार आहेत, या प्रश्नावर खासदारकीच्या निकाला दिवशीही त्यांनी दंड थोपटले होते, असा चिमटा आ. महेश शिंदे यांनी काढला.

कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आ. महेश शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आ. शशिकांत शिंदे यांनी केलेल्या आरोपांवर सडेतोड प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, आ. शशिकांत शिंदे यांनी आत्मपरिक्षण करावे. ते या मतदारसंघात आमदार होते. 16 महिने जलसंपदामंत्री होते. आम्ही जो विकास करतोय, तो विकास त्यांनाही करणे शक्य होते. कोरेगाव मतदारसंघातील कार्यकर्ते दबावाला बळी पडून काही करत नाहीत. माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना त्यांच्या फलटण विधानसभा मतदारसंघाने त्यांना 25 हजारांचे मताधिक्क्य दिले. आ. शिंदे यांचे काम योग्य असते तर त्यांना खासदारकीला कोरेगाव संघात 7 हजार मतांनी पराभूत झाले नसते. त्यांचा जनाधार किती आहे, हे समजून येते.

पुढे बोलताना आ. महेश शिंदे म्हणाले, कोरेगाव मतदारसंघातील गुन्हेगारांवर कारवाई सुरु आहे. त्यांच्यावर गंभीर गुन्हे आहेत. बोगस तडीपारी कारवाई करण्याची धमक कोणत्याही अधिकार्‍यात नसेल. आ. शशिकांत शिंदे यांनी आत्मपरिक्षण केले पाहिजे. त्यांची राजकीय कारकिर्द समाजातील तरुणांना गुडगिरीकडे नेण्यात घालवली आहे. गुंडांची फॅक्टरी त्यांनी तयार केली. गुंडगिरी मोठ्या प्रमाणात बोकाळली. प्रतापसिंहनगरात अल्पवयीन मुलीचे पोट फाडले होते. तरीही पोलिसांनी गप्प बसायचे का? ते गोड बोलतात आणि गुंडांना सहकार्य करतात.

आ. महेश शिंदे म्हणाले, शशिकांत शिंदे मोठे गुन्हेगार आहेत. राज्य सरकारच्या जमिनीत त्यांनी प्रचंड मोठा अपहार केला आहे. ते आजही फरार आहेत. त्यांना जामीन मिळाला नाही. फरार गुन्हेगार पोलीस, प्रशासनाला नैतिकता दाखवतो आहे. प्रशासन अलर्ट झाले तर त्यांनाच कारागृहात जावे लागेल. आ. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना टीडीआर घोटाळा झाला. त्यावेळच्या राज्य सरकारने गंभीर कलमे आ. शशिकांत शिंदे यांच्यावर लावली आहेत. ते फरार गुन्हेगार आहेत. शेतकर्‍यांचे पैसे खावून फरार झालेले गुन्हेगार आहेत. त्यांनी प्रथम स्वत:च्या जामीनाचे बघावे. शेतकर्‍यांचे खालेले पैसे परत करावेत. 67 गाळे परत दिले पाहिजेत. स्वत:ला माथाडी कामगार भासवून, स्वत:चा पगार 72 हजारांपेक्षा कमी दाखवून खोटे प्रतिज्ञापत्र जोडून वाशीमध्ये 6 कोटींचे घर घेतले आहेत. हे सर्व त्यांनी प्रथम परत द्यावे. मग नैतिकतेवर बोलावे, असा टोलाही महेश शिंदे यांनी लगावला.

जरांगे एका चळवळीचे मोठे नेते…

जरांगे पाटील हे माझ्याविरोधात कधीच ‘फॅक्टर’ उभे करतील, असे मला वाटत नाही. आम्ही सगळेच त्यांच्या भूमिकेशी काही अंशी सहमतही असतो. ते एका (मराठा) चळवळीचे मोठे नेते आहे. माझ्या सारख्या छोट्या कार्यकत्याबाबत ते काही करतील, असे वाटत नाही, असे स्पष्टीकरणही आ. शिंदे यांनी दिले.

By Admin

You cannot copy content of this page