
सातारा -प्रतिनिधी : मंगळवार दि.२२ रोजी १० लाखांची खंडणी मागितली , म्हणून लल्लन आणि त्याच्या टोळीवर शहर पोलीसात गुन्हा दाखल झाला. तर त्याने १ वर्षांपूर्वी जीवघेणा तलवार हल्ला करून जबर जखमी केलेल्या युवती सोबत ती शिक्षण घेत असलेल्या कॉलेज परिसरात जाऊन छेडछाड केली. लल्लन सोबत त्याच्या काही साथीदारांनी तिच्या सोबत लज्जास्पद वर्तन करून प्रचंड त्रास दिला. याबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे संबंधित मुलीने आपली कैफियत मांडल्यानंतर शहर पोलीसात लल्लन आणि त्याच्या पिल्लावळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनेक गुन्ह्यांचे मालक असलेले मोका अंतर्गत कारवाईतून दत्ता जाधव आणि युवराज जाधव हे दोघे कळंबा कारागृहात बाहेर पडले. त्यानंतर लहानपणापासून उचापती करत अनेक गुन्हे करणाऱ्या लल्लन उर्फ अजय दत्तात्रय जाधव हा गेल्या आठवड्यापासून जाधव कुटुंबाची प्रतापसिंह नगर परिसरात संपलेली दहशत पुन्हा निर्माण करण्यासाठी तो ॲक्टिव्ह झाला आहे.
लल्लनने १ वर्षांपूर्वी प्रतापसिंह नगरात काही रिक्षांची तोडफोड करुन दहशत माजवली होती.त्यावेळी त्याच्या समवेत असलेल्या काही साथीदारांनी काही जणांच्या घरावर मोठ्या प्रमाणावर दगडफेक करून फोडाफोडी केली होती . यावेळी अगंद वाघमारे यांच्या घरात घुसून कुटुंबावर जीवघेणा तलवार हल्ला केला. यात त्यांच्या मुलीच्या पोटावर तलवारी मारुन जबर जखमी केले. त्याप्रकरणी लल्लन सह टोळीवर गुन्हा दाखल झाला. त्याप्रकरणी तो सध्या जामीनावर बाहेर आहे.
ती युवती सध्या साताऱ्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. बाप दत्ता जाधव हा कळंबा कारागृहात बाहेर आल्यावर लल्लन पुन्हा मस्तीत वागू लागला आहे. स्विफ्ट कार मधून महाविद्यालयात परिसरात जाऊन त्या युवती सोबत अश्लील, लज्जास्पद वर्तन केले. याबाबत संबंधित युवतीने थेट पोलिस मुख्यालयात जाऊन वरिष्ठांसमोर कैफियत मांडली.
गुन्हेगारीची पार्श्वभूमी असलेल्या जाधव कुटुंबावर मोका अंतर्गत कारवाई होऊन कारागृहात राहून ही ते सुधारले नाहीत. सतत अती गंभीर गुन्हे करत पोलीसांना नाकीनऊ आणणाऱ्या जाधव कुटुंबाला कायदेशीर कचाट्यात अडकवून कायमची अद्दल घडविण्यासाठी कठोर कारवाई करण्याची वेळ आली आहे. उदरनिर्वाहासाठी जत तालुक्यात साताऱ्यात आलेल्या या कुटुंबाने ऐतिहासिक साताऱ्याची बदनामी केली आहे. मंत्री , खासदार, पालकमंत्री , आमदार हे सत्ताधारी असून त्यांच्याकडून या कुटुंबाला जिल्ह्यातून हद्दपार करावे,अशी मागणी सातारकर करु लागले आहेत.
दिवसात दोन गुन्हे तरी तो मोकाट
लल्लन सोबत त्याचे साथीदार सतत कोणाला ना कोणाला नाहक त्रास देत फिरत असतात. अल्पवयीन असल्यापासून गुन्हे करणाऱ्या लल्लनवर मोठ्या प्रमाणावर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याच्यासह टोळीतील काही जणांची शासकीय भूखंडावरील घरे जमीनदोस्त केली होती.त्याच्यावर मंगळवार दि.२२ रोजी सकाळी आणि संध्याकाळी असे दोन गुन्हे दाखल झाले आहेत. बापासह चुलत्यावर मोका अंतर्गत कारवाई झाली तरी ही न सुधारलेल्या अनेक गुन्ह्यांचा मालक असलेल्या लल्लनवर पोलीस अधीक्षक यांनी कडक ॲक्शन घेऊन बंदोबस्त करावा,याकडे सातारकरांची मागणी जोर धरू लागली आहे.
पालकमंत्र्यांनी लक्ष दिले तरचं होईल बंदोबस्त
सध्या सातारचे पालकमंत्री हे कडक शिस्तीचे असून गैरप्रकार, अवैध, चुकीच्या प्रकरणी ते सडेतोड भूमिका घेतात. गेली ३० वर्षांहून अधिक काळापासून प्रतापसिंह नगरात जाधव कुटुंबाची दहशत प्रशासनाने संपवली.मात्र १० दिवसांपासून पुन्हा दहशत निर्माण करण्यासाठी जाधव कुटुंबाने फणा काढून गुन्हे करायला सुरुवात केली आहे. पालकमंत्र्यांनी वेळीच हा फणा ठेचून काढून साताऱ्यात शांतता कायमस्वरूपी ठेवावी, यासाठी पोलीसांना मोकळीक देऊन जाधव कुटूंबाचा करेक्ट कार्यक्रम करावा, अशी अपेक्षा सातारकरांची आहे.
