
सातारा : शांत परिसर म्हणून प्रसिद्ध असलेल्या शाहूपुरी परिसरास अवैध धंद्यांनी जणू आता नव्याने पोखरण्याचा चंगच बांधला आहे. येथील खासगी सावकारीसह अवैध उत्खनन, चक्री, मटका, जुगार अड्ड्यांनी शाहूपुरीकरांचे जीवन उद्ध्वस्त केले आहे. याप्रकरणी सातार्यातील अवैध धंदे वाल्यांचे कर्दनकाळ ठरलेल्या पोलीस प्रमुखांनीच लक्ष देण्याची सर्वसामान्यांनी मागणी केली आहे.
पैसा हे सर्वस्व नाही, मात्र पैसा हा माणसाला प्रत्येक क्षणी लागणारी गोष्ट आहे. बहुतांश प्रसंगात पैसा गाठीला असेल तर त्या प्रसंगाशी दोन हात करण्याची धमक त्या व्यक्तीमध्ये येते. प्रसंगही काही सांगून येत नसतात. अडचणी या सर्वसामान्यांपासून उद्योजकांपर्यंत पाचवीलाच पुजलेल्या आहेत. उद्योजक काहीतरी गहाणवट ठेवून किंवा आणखी काही कुलंगड्या करुन बँकेतून कर्ज काढू शकतात. मात्र, सर्वसामान्यांना बँका ढिगभर कागदपत्रांची पूर्तता केल्याशिवाय कर्जाचा छदामही मिळून देत नाहीत. अचानकच आलेल्या अडचणीच्या काळात अगदी नात्यातील लोकही पाठ फिरवतात. मित्र रस्ता बदलतात. स्मॉल फायनान्सवाले नाडून तारणाची मागणी करतात. अशावेळी कोणाच्या तरी ओळखीने शोध सुरु होतो. एखाद्या खासगी सावकाराचा.
खासगी सावकाराचा शोध संपल्यानंतर त्याला पटविण्याचे उद्योग सुरु होतात. महिनाभराकरता लागणार्या पैशासाठी त्याला तीन किंवा पाच धनादेश, तारण, स्टॅम्प आदी सोपस्कार पार पाडावे लागतात. मात्र हे सोपस्कार एकच दिवसात पूर्ण होणारे असल्याने आणि गरजवंताला अक्कल नसल्याने तो ते सोपस्कार पार पाडतो. या द्रविडी प्राणायामातून बाहेर पडल्यानंतर मागणी केलेल्या रकमेतून सावकार आधीच ऍडव्हान्स म्हणून मुद्दलातूनच व्याजाची रक्कम कट करुन उर्वरित रक्कम गरजवंताला सोपवतो. एकाच महिन्यात पैसे फेडू या भावनेतून तो नडलेला याही प्रकाराला इच्छा नसताना मूक संमती दर्शवतो. मात्र, यापुढे सुरु होतो खरा पिक्चर…
महिन्याभरात मिळणारे पैसे काही कारणाने मिळू शकत नाहीत आणि सावकार महिनाभरात दारात दत्त म्हणून हजर असतो. शेठ या महिन्यात करतो, त्याचे असे झाले… करीत कशी तरी सावकाराची बोळवण केली जाते. मात्र जाताना सावकार संध्याकाळपर्यंतची मुदत फक्त व्याज तरी दे या बोलीवर देतो. व्याजाची रक्कम कशीतरी उभारुन गरजवंत कसातरी जीव वाचवतात. मात्र घरात आलेल्या अनंत अडचणींमुळे व्याज आणि थोडेफार मुद्दल देत दिवस ढकलले जातात.
इकडे सावकाराने 20 ते 30 टक्के महिना प्रती शेकडा व्याजाचा दर आकारला असल्याने काही कालावधीतच व्याजावर व्याज (चक्रवाढ) सुरु होते. यानंतर सुरु होते त्या गरजवंताची ससेहोलपट. गाडी ओढून नेईन, संपूर्ण संसार नेईन, टीव्ही- गॅस टाकी तरी दे… असे म्हणता म्हणता जिवंत ठेवणार नाही, खलास करेन, असे डायलॉग कधी सुरु होतात, हे त्या बिचार्या गरजवंताला कळतही नाही. एखाद्या दिवशी तो ज्यावेळी याचा हिशोब मांडतो. तेव्हा डोक्यावर हात मारुन घेण्याशिवाय त्याला पर्याय नसतो. कारण हिशोब केला असता खासगी सावकाराला दिलेले व्याज आणि जमा केलेली मुद्दल पाहता तो कधीच कर्जातून मुक्त झालेला असतो. मात्र तरीही वाघाच्या जिव्हेला लागलेल्या रक्ताप्रमाणे सावकार काही त्या बिचार्याची पाठ सोडत नसतो. सावकाराला हिशोब समजावून सांगितला तर तो आणि त्याचे चेले त्या गरजवंताला येथेच्छ बुकलून काढतात. घरातील महिलांपर्यंत या भिकारचोटांची मजल जाते. शेवटी एखादा हतबल आपले जीवन संपवून यातून स्वत:ची मुक्तता करुन घेतो. हो, शेवटी पर्यायच नसतो. खासगी सावकारीच्या पाशात अडकलेल्याच्या नशिबी शेवटी मरणच असते.
आपली हतबलता, झालेली छळवणूक आणि केलेला हिशोब घेवून पोलिसांकडे गेले तर ते या गरीबाला धीर देण्याऐवजी प्रश्नांची सरबत्ती करीत त्यालाच चोर ठरवून सावकाराला साव ठरवतात. बाहेर पडल्यानंतर आकाश फाटलेले दिसत असते. शाहूपुरीत सद्यघडीला अशाच जुन्या जाणत्या खासगी सावकारांनी तोंड वर काढले आहे. हे सावकार 15 ते 20 टक्के महिना प्रती शेकडा व्याजाचा दर आकारुन गोरगरीबांना नाडत आपल्या घरावर सोन्याची कौले चढवित आहेत. एखादा दिवस जरी व्याजाचा चुकला तरी पूर्ण महिन्याचे व्याज त्या गरजवंताच्या माथी मारत आहेत.
अवैध सावकारांसह अवैध धंदेवाल्यांचे कर्दनकाळ ठरलेले आणि जिल्ह्यात कायद्याचे राज्य निर्माण करु पाहणारे जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी या अवैध खासगी सावकारांवरही लक्ष केंद्रीत करुन यांच्या जाचातून शाहूपुरीकरांची मुक्तता करावी, अशी मागणी समस्त शाहूपुरीवासी करीत आहेत.
