
सातारा : कासवरुन साताऱ्याच्या दिशेने येणाऱ्या भरधाव डंपर चालकाने पादचाऱ्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात अचानक ब्रेक दाबल्याने डंपर घाटातच पलटी झाला. या अपघातात तीन मुलींना धडक बसली असून तिन्ही मुली सख्ख्या व मामे बहिणी आहेत. दरम्यान, अपघातानंतर डंपर चालक पसार झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दिक्षा अशोक मुरारी (वय १५), अमुल्या अशोक मुरारी (वय १७) व अक्षरा शंकर कांबळे (वय १७, तिघी रा. मंगळवार पेठ, सातारा) अशा जखमी झालेल्या मुलींची नावे आहेत. एका मुलीला डिस्चार्ज दिला असून दोघींवरखासगी व सिव्हिल मध्ये उपचार सुरू आहेत.
याबाबत तालुका पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, सातारा शहराच्या दिशेने कास बाजूकडून डंपर भरधाव वेगाने येत होता. पॉवर हाऊस झोपडपट्टी येथील पाच मुली यवतेश्वर घाटात फिरायला गेल्या होत्या. फिरतअसताना त्या रस्ता ओलांडत होत्या. अवघड वळणावर समोरून आलेला डंपर त्यांना दिसला नाही. घाटातल्या वळणावर अचानक मुली रस्ता ओलांडत असल्याचे डंपर चालकाच्या निदर्शनास येताच त्याने त्या मुलींना वाचवण्यासाठी ब्रेक दाबला. ब्रेक दाबल्याने डंपर जागीच पलटी झाल्याने मोठा आवाज झाला. या अपघातात तीन मुली जखमी झाल्या. तसेच डंपर चालकही किरकोळ जखमी झाला. स्थानिकांनी तत्काळ मदतकार्य करुन त्याची माहिती पोलिसांना दिली. सातारा तालुका पोलीस ठाण्याचे अपघात विभागाचे जवान विशाल मोरे हे घटनास्थळी पोहचले. तसेच शाहुपूरी पोलीस ठाण्याचे अपघात विभागाचे जवानही घटनास्थळी पोहचले. जखमीमधील एका मुलीला डिस्चार्ज दिला असून दोघींवर खासगी व सिव्हिल मध्ये उपचार सुरू आहेत. याअपघाताची नोंद सायंकाळी उशिरापर्यंत शाहुपूरी पोलीस ठाण्यात करण्याचे काम सुरू होते.
