
सातारा : मूळ पुशेगावचा असणारा एक देशमुख सातार्यात आला. आल्यानंतर सातारी वारे लागले आणि हा भलताच शेफारला. इतरांसमोर वेगवेगळ्या प्रकारच्या बढाया मारुन हे महाशय आता तर स्वत:ला सातारचे किंग च जणू समजायला लागले आहेत. मात्र सार्याचा उतारा म्हणजे सातारा, हे ते कदाचित विसरले असावेत.माणसाला पैसे कमविण्याची आणि त्यातल्या त्यात विनाकष्ट पैसे कमविण्याची दोनच साधने. एकतर जुगार; नाहीतर खोटे बोलून, इतरांची फसवणूक करुन पैसे कमविणे. या दोनही साधनांकडे तीच माणसे वळतात, ज्यांना कष्ट नकोसे असतात. ज्या लोकांची संगत वाईट, त्यांचे आचरणही त्याच पद्धतीचे बनते. किंवा असे म्हणूया की ते तसे वागायचा प्रयत्न करतात. काही पैशाने मोठ्या असलेल्या माणसांच्या सहवासात गेली तर ती व्यक्तीही स्वत:ला त्याप्रमाणेच समजायला लागते. त्यातून त्या धनिकाच्या कृतीचे कॉपीराईट केले जाते. त्याचे खाणे-पिणे, राहणे, शौक याही गोष्टी इतरांसमोर ‘मी असाच आहे’, या फुशारकीखाली दाखवल्या (भासवल्या) जातात. ज्या जमत नाहीत, त्याबाबत बेमालूमपणे खोटे बोलून समोरच्या माणसाला आपल्या इम्प्रेशनखाली घेतले जाते. ही जादू बर्याचवेळा चालते. पण काहीठिकाणी ही चालत नाही. कारण समोरचाही त्याचा यातील बाप असतो.असाच एक मूळ पुशेगावचा आणि आता सडरबझारमध्ये राहत असलेला महाभाग.
काय वर्णावी त्याची महती ? डेव्हलपर्सच्या कामावर किती पोती सिमेंट आले, खडी किती आली, वाळूचे काय झाले? हे पाहणारा आणि त्याची नोंद ठेवणारा हा एक साईट सुपरवायझर. सुपरवायझर या शब्दांत सुपर असलेला वाईजर हा अर्थ येतो. त्याप्रमाणेच हा सुपर वाईज असलेला बेटा अतीचाणाक्ष निघाला. सुपरव्हिजन करता-करता त्याने चंदननगरमधील एका वयोवृद्धाला आपले सावज केले. त्या वयोवृद्धाची ओळख काढून आपण कसे इमानदार आहे, हे खोटे-खोटे दाखवून त्याने त्या वयोवृद्धाचा विश्वास संपादन केला. यानंतर त्या वयोवृद्धाची जागा हेरुन या बहाद्दराने त्या वृद्धाला तीन फ्लॅटचे आमिष तसेच इतरही अनेक स्वप्ने दाखवून त्यांना आपलेसे केले. विश्वास दाखवण्याकरीता या वृद्धाबरोबर रितसर (?) करार केला. या करारानुसार त्या वृद्धास या भामट्याने 14 लाखांचे न वठणारे तीन धनादेशही दिले. वृद्धत्वामुळे बुद्धी क्षीण झालेल्या त्या वृद्धास ही मात्रा खरोखरच लागू पडली. वृद्धाचा विश्वास संपादन करण्यात त्याला यश आले. यथावकाश वृद्धाच्या जागेवर एक टुमदार इमारत उभीही राहीली. जागा मोक्याची असल्याने या इमारतीमधील फ्लॅट लगोलग विकले गेले.
मात्र, हे फ्लॅट विकत असताना संबंधित वृद्ध या अमर्या देशमुखाला त्यांचे हक्काचे फ्लॅट मागत होते. परंतू एवढ्या मोठ्या रकमेची लालसा आल्याने या बेण्याने त्यांना गोडगोड बोलून वृद्धाच्या हक्काचे तीनही फ्लॅट विकले. हे फ्लॅट विकले गेल्यानंतर त्या वृद्धाकडे राहिले ते फक्त धनादेश. मात्र तेही न वठणारेच होते. कालांतराने हा वृद्धही निवर्तला. वृद्धाचे निधन झाल्यानंतर त्यांच्या वारसांनी या अमर्याला पैसे मागण्यास सुरुवात केली. मात्र हा काही ताकास तूर लागू देत नव्हता. होही नाही, आणि नाही ही नाही, या चलनात या भामट्याने या बिचार्यांना घरचीच मोरी आणि मुतायची चोरी केली आहे. स्वत:चा पैसा असूनही तो उपयोगी पडत नाही, हे शल्यच त्यांना खात आहे.
या सर्व प्रकरणामध्ये या वारसांच्या मुलींची लग्नेही ठरली. मात्र पैशा अभावी ती मोडली गेली. लग्ने ठरत असताना देशमुखांचा अमर्या त्यांना पैसे देण्याचे अभिवचन द्यायचा आणि आला दिवस पुढे ढकलायचा. मात्र ऐनवेळी तो पाठ दाखवून निघून जायचा. त्यामुळे त्या मुलींचीही लग्ने मोडण्याचे पाप या कार्ट्याने केले आहे. यासंदर्भात माहिती घेतली असता हा परिवार या भामट्याविरोधात पोलीस ठाण्यात रितसर तक्रार नोंदवून त्यासंबंधीत असलेल्या प्रती अन्य वरिष्ठांसह संबंधित मंत्र्यांनाही पाठविणार असल्याचे समजत आहे.सुपरवायझर चा मालक झाल्यानंतर अमर्याला चेव चढला. खोटे बोलून या जगात सर्वकाही शक्य आहे, हे त्याने जाणून घेतले. यानंतर येणार्या प्रत्येक इसमाशी आपल्या चालू नसलेल्या साईटस् सांगणे, हे मी केले-ते मी केले, आत्ताच मंत्री साहेबांच्या बैठकीत होतो, त्यामुळे तुमचा फोन उचलू शकलो नाही, अशी अत्यंत विनयाने ढाक मारणे आणि नंतर या सावजालाच गळाला लावणे, यामध्ये तो तरबेज झाला.
(मंत्री मामांबरोबरचे क्षण (?) वाचा पुढील भागात)- क्रमश:
