
सातारा : काही दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा शहर हे फ्लेक्समुक्त करण्यात यावे, याबाबतच्या सूचना सातारा पालिकेला दिल्या होत्या. त्याचे पालन करुन पालिकेने काही फ्लेक्स तर हटवले. मात्र, ज्या थोर विभुतींमुळे सातारची ओळख आहे, त्या श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले यांच्या पुतळ्यासमोर पालिकेने स्वत:चा गवगवा करणारा स्क्रिन लावून काय मिळवले, असा सवाल सातारकरांमधून उपस्थित होत आहे.
सातार्याचा इतिहास पहायला गेले तर छत्रपती शिवप्रभूंच्या पदस्पर्शाने पुनित झालेली ही भूमी आहे. थोर क्रांतिकारकांचा याला वारसा आहे. त्यांच्या यशोगाथा महाराष्ट्रासह देशभरात प्रसिद्ध आहेत. त्याच सातारा शहराला काही वर्षांपासून फ्लेक्सचा विळखा पडला होता. कोणाचा वाढदिवस असो, वा पुण्यस्मरण दिन; त्यांचे फ्लेक्स सातारा शहरातील राजवाडा, पोवई नाका तसेच अन्यत्र ठिकाणी सुंदर सातार्याला बट्टा लावण्याचे काम करीत होते. मात्र, मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फ्लेक्स हटवा चा नारा दिला. यानंतर संपूर्ण मंत्रिमंडळ खडबडून जागे झाले.सातारा शहरात कोणाचाही वाढदिवस असो, फ्लेक्स दिसता कामा नये, असे आदेश दस्तुरखुद्द बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काढले. अगदी आमचे जरी वाढदिवस असले तरी सातार्यात फ्लेक्स लावण्यात येऊ नयेत, असेही ते म्हणाले.
यानंतर पालिकेची पाचावर धारण झाली. फ्लेक्सच्या माध्यमातून मिळणार्या निधीवरच अंकुश आले. यानंतर पालिकेने शक्कल लढवत स्क्रिनची टूम काढली.त्यातीलच एक स्क्रिन राजवाडा परिसरातील गोलबागेत श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या पुतळ्यासमोर बसविण्यात आली. त्यातून पालिकेने आपला उदोउदो सातारकरांसमोर मांडला आहे. पालिकेने जी विकासकामे केली, त्याची पब्लिसिटी त्यांनी करावी. मात्र, जागा चुकली. ज्या श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराजांमुळे सातारची ओळख आहे. त्यांच्या पराक्रमापुढे पालिकेची विकासकामे म्हणजे सूर्यासमोर काजवा आहेत. पालिका या स्क्रिनच्या माध्यमातून जी विकासकामे दाखवित आहे, त्याचा सातारकरांना काय उपयोग झाला, हे त्यांनीच सांगावे. सातारा शहरातील खड्डे सुस्थितीत असून त्यांच्यावर डांबररुपी राक्षसाने अजूनही हल्ला केलेला नाही आणि करेल, असे वाटतही नाही.असो, पण फ्लेक्सचा विळखा संपल्यानंतर पालिकेने स्क्रिन सातारकरांच्या माथी मारण्याचे पाप केले आहे. आता जी विकासकामे या स्क्रिनवर येत आहेत, त्याच जागेवर काही दिवसानंतर वेगवेगळ्या आस्थापनांच्या जाहिराती झळकणार आहेत, हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही. जर तुम्हाला स्क्रिन लावायचीच होती तर ती अन्यत्र लावली पाहिजे होती. गोलबाग ही काल परवाची नसून स्वातंत्र्योत्तर काळापासूनची आहे.
श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठीही रंगो बापू गुप्ते यांच्याबरोबर सहभाग घेतला होता. स्वातंत्र्य संग्रामात ज्यांनी भाग घेतला त्यांची माहिती देणारी कोनशिलाही येथे आहे. मात्र, या सर्व इतिहासाचा विसर पाडून सातारा पालिका आपलीच टिमकी वाजवायला बघत आहे. पालिकेच्या या कृतीचे सातारकर कधीही समर्थन करणार नाहीत. त्यामुळे पालिकेने स्वत:ची पाठ थोपटून घेण्याच्या नादात इतिहासाची पाने फाडू नयेत. जर स्क्रिन लावायचा असेल तर तो अन्यत्र बसवावा, अशा प्रतिक्रिया सातारकरांमधून उमटत आहेत.
संध्याकाळी राजवाडा परिसरात असणार्या चौपाटी, गोलबाग, श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह उद्यान येथे येणार्यांची गर्दी असते. वाहतूकही मोठ्या प्रमाणात असते. अशावेळी स्क्रिन बघण्याच्या नादात जर वाहनचालकांकडून अपघात घडले, तर त्याची जबाबदारी पालिका घेणार का, असाही सवाल यानुषंगाने उपस्थित होत आहे.
