सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघातून खासदार उदयनराजे भोसले यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या. काहीही झालं तरी आपल्याला जिंकायचं आहे. उदयनराजे यांना निवडून द्या.. कामाचं आमच्यावर सोडा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले.
महायुतीचे लोकसभा उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ केलेल्या जाहीर सभेचे बोलत होते. याप्रसंगी आमदार मकरंद पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, आमदार देवयानी फरांदे,भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, दत्तानाना ढमाळ, राष्ट्रवादीचे राज्य सरचिटणीस प्रतापराव पवार, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अमित कदम, किसनवीर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे पाटील, लोकसभा निवडणूक संयोजक सुनील काटकर माजी कृषी सभापती शशिकांत पिसाळ जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उदय कबुले आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड माजी कृषी सभापती किरण साबळे पाटील महाबळेश्वरचे माजी सभापती संजय गायकवाड राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस श्रीनिवास शिंदे, माजी उपसभापती विजय नायकवडी, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळासाहेब सोळस्कर, राजेंद्र लवंगारे ज्येष्ठ नेते बकाजीराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
उदयनराजे भोसले म्हणाले, काँग्रेस नेत्यांनी शेतकरी जवान महिला गोरगरीब यांच्यासाठी योजनांची घोषणा करून पोत्याने मते घेतली मात्र विकासाच्या बाबतीत जनतेला वाऱ्यावर सोडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांनी जनतेच्या हितासाठी प्रवाहासोबत जाण्याचा निर्णय घेतला. तर त्यांना गद्दार ठरवले गेले. कोणत्याही वैयक्तिक स्वार्थापोटी त्यांनी हा निर्णय घेतलेला नाही. भविष्यामध्ये केंद्राच्या माध्यमातून वाई खंडाळा महाबळेश्वर या मतदारसंघांमध्ये अनेक प्रकल्प आणले जाणार आहेत. स्ट्रॉबेरी आले हळद संशोधन केंद्र वाई येथे उभारण्यात येणार आहे. तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत क्षेत्र महाबळेश्वर, मांढरदेवी यांचा विकास आमदार मकरंद पाटील यांच्या माध्यमातून सुरू आहे. महाबळेश्वर पाचगणी वाई या नगरपालिकांना जो काही निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून लागेल तो मंजूर करण्याचं काम माझं राहील. दोन ते प्रतापगड हा रोपवे करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील. जनतेने विकास करणाऱ्यांसोबत राहावं.
महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, याची मागणी उदयनराजे यांनी केलेली आहे. माझ्या जाहीरनाम्यात देखील ही मागणी आहे. चव्हाण साहेबांना हा पुरस्कार मिळावा, यासाठी प्रयत्न केले जातील, असेही अजितदादांनी सांगितले.
आमदार मकरंद पाटील म्हणाले, शेतकऱ्यांच्या मालकीचे दोन कारखाने कर्जातून बाहेर काढण्यासाठी अजित दादांच्या सोबत जाण्याचा आम्ही निर्णय घेतला. शासनाने कारखान्यांना 500 कोटींची थकहमी दिलेली आहे. गेल्या अजितदादांनी तब्बल एक हजार कोटी रुपये मतदार संघाच्या विकासासाठी दिले. मतदारसंघातील जनतेसाठी आपण महायुती सोबत असून खासदार उदयनराजे भोसले यांना निवडून आणण्यासाठी रात्रीचा दिवस करूया. जनतेच्या कामासाठी मी खंबीर आहे, त्यासाठी कोणाच्या दारात जायची गरज नाही, असे देखील आमदार मकरंद पाटील यांनी ठणकावले.
