महाबळेश्वर, दि. १८ (प्रतिनिधी) : सामान्य जनतेने कर थकवला तर त्याच्यावर तात्काळ कारवाई केली जाते. परंतु ज्यांच्या डोक्यावर राजकीय वरदहस्त आहे अशा लोकांना मात्र कर बुडवूनही नगरपालिकेची उमेदवारी मिळते. याविरोधात न्यायालय योग्य तो निर्णय करेलच. पण अशा कर बुडव्या उमेदवारांना महाबळेश्वरची जनता घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास महाबळेश्वर गिरिस्थान नगरपालिका निवडणुकीतील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुमारभाऊ शिंदे यांनी व्यक्त केला.

महाबळेश्वर नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत निवडणुकीसाठी येथे शनिवारी,२० डिसेंबर रोजी मतदान होत आहे. या निवडणूक प्रचारात विरोधकांचा जोरदार समाचार घेताना कुमार भाऊ शिंदे बोलत होते. ते म्हणाले, नगरपालिकेला आर्थिक उत्पन्न मर्यादित असते. त्यामध्ये कर हा खूप महत्त्वाचा घटक आहे. यामधून गोळा होणाऱ्या पैशातून जनतेसाठी रस्ते, पाणी, आरोग्य सुविधा, सार्वजनिक शौचालय आदी मूलभूत सुविधा पुरवल्या जातात. तसेच महाबळेश्वरचे संपूर्ण अर्थकारण ज्याच्यावर अवलंबून आहे तो पर्यटक येथील पॉईंट बघण्यासाठी येतात. या पर्यटन स्थळांचे सुशोभीकरण आणि इतर सुविधांची कामे देखील नगरपालिकेच्या निधीतून केली जातात. काही विरोधी उमेदवारांनी नगरपालिकेचा कर बुडवलेला आहे. आणि पालिकेचे आर्थिक नुकसान करणारी हीच मंडळी आज निवडणुकीत उभी आहेत. चोरानेच तिजोरीची चावी मागण्याचा हा प्रकार झालेला आहे. संबंधित उमेदवारांनी प्रदूषण व जाहिरात कर कशा पद्धतीने बुडवलेला याचे सर्व पुरावे आपण उच्च न्यायालयात सादर केले आहेत. निवडणूक प्रक्रियेत अडचण नको म्हणून न्यायालयाने तुर्त हिरवा कंदील दाखवला आहे. परंतु पुढील सुनावनीची तारीख दिलेली आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी न्यायालयाला आमचे पुरावे मान्य आहेत असे सिद्ध होत आहे. सामान्य जनतेने कर बुडवला तर त्यांच्यावर तात्काळ कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाताला आता काय कापरे भरले का? कर बुडव्यांना साथ देणाऱ्या या अधिकाऱ्यांवर देखील आपण कारवाईची मागणी केली असल्याचे कुमारभाऊ शिंदे यांनी सांगितले.

कर बुडवेगिरीच्या विरोधात आम्ही उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. तेथे आम्हाला योग्य न्याय मिळेलच. विरोधी उमेदवारांच्या टोळीची चालुगिरी येथील जनता खपवून घेणार नाही. न्यायदेवते बरोबरच आज महाबळेश्वरच्या जनता जनार्धनाच्या न्यायालयात उभे राहून न्याय मागत आहोत. अशा कर बुडव्या उमेदवारांना महाबळेश्वरची सुज्ञ जनता जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास कुमारभाऊ शिंदे यांनी व्यक्त केला. आश्वासनाची खैरात वाटणाऱ्या मंत्री महोदयांनी मात्र कर बुडवा विषय पद्धतशीरपणे झाकून ठेवला. शनिवारी होणाऱ्या मतदानादिवशी महाबळेश्वरची जनता आपल्याले मतदानरुपी आशीर्वाद आम्हाला देतील, असेही कुमार शिंदे यांनी सांगितले.

ये पब्लिक है सब जानती है’

नगराध्यक्ष पदासाठी उभे असणाऱ्या उमेदवारांचे सामाजिक योगदान काय? त्यांनी आजपर्यंत काय काम केले हे न सांगता मंत्री महोदयांनी आपण असा नगराध्यक्ष दिला आहे की त्यांचे चुलते, चुलती, काका विविध राजकीय पदांवर होते, असा उमेदवार दिला असल्याचे सांगतात. याचा अर्थ सर्वसामान्य जनतेला आपण कधीच संधी देणार नाही का? नातेवाईक विविध पदांवर होते, यात उमेदवाराचे कार्यकर्तृत्व काय? मागील कार्यकाळात आम्ही संधी दिली नसती तर स्वीकृत तरी झाला असता का? बाहुले आणि कुचकामी नेतृत्व शहराचा विकासाचा गाडा पुढे नेण्याऐवजी 5 वर्षे मागे नेईल, अशी टीकाही कुमार भाऊ शिंदे यांनी विरोधकांचा समाचार घेताना केली.

By Admin

You cannot copy content of this page