प्रतिनिधी: सातारा नगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर नवनिर्वाचित आणि नियुक्त पदाधिकाऱ्यांचे पालिकेतील आगमन मोठ्या थाटामाटात झाले. प्रत्येकाला आपापली प्रशस्त ‘कॅबिनेट’ मिळाली, दालने सजली, पण दुर्दैवाने या सत्ताधाऱ्यांना ज्यांच्या विचारांनी समाज घडला, त्या महापुरुषांचा विसर पडल्याचे धक्कादायक चित्र पाहायला मिळत आहे.​

महापुरुषांच्या प्रतिमांची ‘दुर्मिळता’​नगरपालिकेच्या नव्याने वाटप करण्यात आलेल्या दालनांमध्ये सध्या चकाकी दिसत असली, तरी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमा शोधूनही सापडत नाहीत. पालिकेतील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांना स्वतःच्या नावाच्या पाट्या आणि सोयी सुविधांची जितकी घाई झाली, तितकी आदरस्थान असलेल्या महापुरुषांच्या प्रतिमा लावण्याची तसदी कोणीही घेतलेली दिसत नाही.​​

प्रशासकीय अनास्था: पालिकेच्या मुख्य दालनांपासून ते विविध समित्यांच्या सभापतींच्या दालनांपर्यंत महापुरुषांचे फोटो लावणे हा केवळ शिष्टाचार नसून ते एक कर्तव्य आहे. मात्र, सध्या अनेक दालनांमध्ये या प्रतिमा ‘दुर्लभ’ झाल्या आहेत.​केवळ निवडणुकीपुरतेच प्रेम?

निवडणुकीच्या काळात याच महापुरुषांच्या नावाचा जयघोष करणारे पदाधिकारी आता खुर्चीवर बसल्यानंतर मात्र त्यांच्या फोटोंना विसरले आहेत का? असा संतप्त सवाल सातारकर विचारत आहेत.​ अनेक दालनांचे नूतनीकरण झाले, साफसफाई झाली, पण भिंतीवर महापुरुषांच्या प्रतिमा लावण्यास कोणालाही वेळ मिळालेला नाही.​​ज्या थोर पुरुषांच्या बलिदानामुळे आणि विचारांमुळे आज आपण लोकशाहीचा उपभोग घेत आहोत, त्याच विभूतींचा विसर पडणे हे सातारा पालिकेच्या परंपरेला न शोभणारे आहे. पालिकेतील या ‘विस्मरण’ वृत्तीवर सध्या शहरात जोरदार टीका होत असून, तातडीने सन्मानपूर्वक प्रतिमा लावण्याची मागणी होत आहे.​”कॅबिनेट आणि खुर्च्यांच्या वादात पालिकेचे पदाधिकारी आपल्या महान वारशाला विसरले आहेत. हा केवळ फोटोचा प्रश्न नसून तो नैतिकतेचा प्रश्न आहे.” — (एक सजग नागरिक)

By Admin

You cannot copy content of this page