
प्रतिनिधी : सातारा नगरपालिकेत हद्दवाढीतील शाहूपुरी परिसराचा समावेश होऊन पाच वर्षे उलटली, तरीही हा भाग आजही मूलभूत सुविधांसाठी चाचपडत आहे. पालिकेकडून होणारे स्वच्छतेचे दावे आणि सोशल मीडियावरील प्रसिद्धीच्या झगमगाटात प्रत्यक्षात मात्र शाहूपुरीतील कचऱ्याचे साम्राज्य आणि खड्डेमय रस्ते ‘जैसे थे’ आहेत. यामुळे “आमचा भाग सुधारणार कधी?” असा संतप्त सवाल गडकर आळी, जवाहर कॉलनी आणि समता पार्क परिसरातील नागरिक विचारत आहेत.
बदामी विहीर ते शिवाजीनगर रस्ता (पेढ्याचा भैरोबा रस्ता ) बनला ‘मृत्यूचा सापळा’
शाहूपुरीला जोडणारा मुख्य मार्ग असलेला बदामी विहीर ते शिवाजीनगर रस्ता सध्या प्रचंड खड्डेमय झाला आहे. हद्दवाढीनंतर या रस्त्याचे नूतनीकरण होईल अशी अपेक्षा होती, मात्र पाच वर्षांनंतरही परिस्थिती बदललेली नाही. निवडणूक वेळी जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने हवेतच विरली असून, पालिकेचा कारभार फक्त कागदोपत्रीच सुरू असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.
स्वच्छता अभियान की जाहिरातबाजी?
संत गाडगे बाबा पंधरवड्यानिमित्त पालिकेने प्रभागांमध्ये स्वच्छता मोहीम राबवली. मात्र,शाहूपुरी (गडकरआळी) परिसरात या मोहिमेचा कोणताही परिणाम दिसून आला नाही. पण स्थानिक लोकप्रतिनिधींच्या इन्स्टाग्राम आणि फेसबुक पेजवर स्वच्छतेचे फोटो झळकून स्वच्छता फक्त सोशल मीडियावर झालेली दिसली, पण प्रत्यक्ष शाहूपुरीत मात्र कचरा कुंडीतून बाहेर अस्ताव्यस्त पडलेला कचरा आणि दुर्गंधीने नागरिक हैराण आहेत. “स्वच्छता अभियान फक्त जाहिरातीपुरतेच आहे का?” असा बोचरा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
दुजाभाव; नागरिकांचा संताप
नागरिकांचा मुख्य संताप हा निधीच्या वाटपावरून आहे. काही प्रभागांमध्ये गरज नसतानाही वारंवार ‘सीलकोट’ मारले जातात, मग शाहूपुरीतील खड्ड्यांना साधे ठिगळ लावण्याचे सौजन्य तरी पालिका का दाखवत नाही? असा सवाल केला जात आहे. “स्थानिक लोकप्रतिनिधी आलिशान गाड्यांच्या काचा वर करून निघून जातात, त्यांना आमचे हाल आमचे प्रश्न दिसत नाहीत का?” असा संतप्त सवाल गडकर आळीतील ग्रामस्थांनी केला आहे.
“आम्ही नियमित कर भरतो, मग आम्हाला सुविधा का मिळत नाहीत? आम्हाला आलिशान रस्ते नकोत, पण किमान पडलेल्या खड्ड्यांत मुरूम टाकून रस्ता चालण्यायोग्य तरी करा. पालिकेने हद्दवाढीतील भागाकडे दुर्लक्ष करणे थांबवावे.”— ग्रामस्थ, गडकर आळी व जवाहर कॉलनी.
‘बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात’
लोकप्रतिनिधींचे “माझा प्रभाग, माझी जबाबदारी” हे वाक्य फक्त भाषणातच व कागदावरच मर्यादित राहिल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. आता या प्रश्नाकडे प्रशासन गांभीर्याने बघणार की पुन्हा एकदा ‘सोशल मीडिया’वरच कामाचा डोंगर दाखवणार? याकडे सर्व शाहूपुरीवासीयांचे लक्ष लागले आहे.
