
सातारा -विशेष प्रतिनिधी: सातारकरांचे श्रद्धास्थान असलेल्या पेढ्याचा भैरोबा डोंगरावर सध्या ‘विकासाची’ अशी काही गंगा वाहतेय की, त्यात भक्तांच्या कष्टाचे घाम आणि डोळ्यांतील आसवे दोन्ही वाहून जाताना दिसत आहेत. सुशोभीकरणाच्या नावाखाली नगरपालिकेने जो ‘नंगा नाच’ मांडला आहे, त्यातून डोंगर हिरवागार होण्याऐवजी अक्षरशः बोडका झाला आहे. भक्तांनी रक्ताचे पाणी करून वाढवलेल्या वृक्षसंपदेवर पालिकेच्या लाडक्या ठेकेदाराने ‘जेसीबी’ फिरवून सातारकरांच्या श्रद्धेचाच गळा घोटला आहे.
बड्या हस्तीचा ‘टेंडर’ खेळ आणि अधिकारी वर्गाची ‘मौनव्रत’ दीक्षा
नगरपरिषदेच्या एका ‘बड्या हस्ती’ने आपल्याच लाडक्या बगलबच्चाच्या नावे सुशोभीकरणाचे टेंडर पदरात पाडून घेतले आणि मग सुरू झाला विनाशाचा उत्सव! ज्या झाडांना भक्तांनी स्वतः पाणी घालून लहानाचे मोठे केले, ती झाडे या ठेकेदाराला ‘अडथळा’ वाटू लागली. सत्तेचा वट्ट आणि राजकीय दबदबा इतका दांडगा की, शेकडो वृक्षांची कत्तल होत असताना पालिकेचे अधिकारी मात्र ‘शेपूट घालून’ खुर्च्या उबवत बसले आहेत. “नियम गेले खड्ड्यात, आम्हाला फक्त कमिशनशी मतलब” अशा आविर्भावात प्रशासन वावरत असल्याचा संताप आता जनसामान्यांतून व्यक्त होत आहे.
श्रमदानाची राखरांगोळी; आता ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’
शाहूपुरी, गडकर आळी आणि करंजे परिसरातील नागरिक पहाटेच्या वेळी डोंगरावर केवळ व्यायामासाठी जात नाहीत, तर ते निसर्गाची सेवा करतात. मात्र, जॉगिंग ट्रॅक आणि जीर्णोद्धाराच्या नावाखाली येथील गौण खनिजाचे उत्खनन करून निसर्गाची लक्तरे वेशीवर टांगली जात आहेत. सुशोभीकरण झाल्यानंतर येथे निसर्गप्रेमी येतील की मद्यपी आणि विकृत चाळे करणाऱ्यांचा अड्डा बनेल, याची धास्ती भक्तांना वाटत आहे. साध्या दारूच्या बाटल्या उचलायची ताकद नसलेल्या प्रशासनाने विकासाचा जो ‘फास’ आवळला आहे, तो पाहून आता सातारकर विचारत आहेत.
हा विकास आहे की विकृती
१५ हजार झाडांची ‘कागदी’ जंगले करण्याचा डाव ठेकेदार खेळत असून पालिका प्रशासन याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत आहे.जुन्या झाडांची कत्तल केल्यावर प्रशासनाने मोठ्या थाटात गाजर दाखवले की, आम्ही १५ हजार झाडे लावणार आहोत. वा! ऐकायला किती छान वाटते. पण वस्तुस्थिती अशी आहे की, याच बनेल ठेकेदाराने गेल्या दोन वर्षांत ५ हजार खड्डे पाडून केवळ १००० झाडे लावली, आणि त्यातील आज फक्त २५ झाडे कसेबसे श्वास घेत आहेत. ज्या खड्ड्यात साधं गवत उगवत नाही, तिथे हा ठेकेदार १५ हजार झाडे जगवणार म्हणजे हा जागतिक चमत्कारच म्हणावा लागेल. या ‘अगाध’ ज्ञानासाठी भैरोबा भक्त या ठेकेदाराला कोपरापासून नमस्कार घालत आहेत.
आता हिशोब ‘भैरोबाच’ घेणार
सरकारी तिजोरीतून बिलांचे आकडे फुगवून काढण्यात मश्गूल असलेल्या या ठेकेदाराला आणि डोळे मिटून बसलेल्या अधिकाऱ्यांना सातारकरांचा रोष दिसत नसेल, तरी “वरती तो बसलाय” याची जाणीव भक्त करून देत आहेत. ठेकेदाराची ही ‘मस्ती’ आणि प्रशासनाची ही ‘सुस्ती’ उतरवण्यासाठी आता साक्षात भैरोबाच आपला तिसरा डोळा उघडेल आणि या पापाचा हिशोब चुकता करेल, अशी भावना प्रत्येक भैरोबा भक्तांच्या मनात दाटून आली आहे. नगरपालिका प्रशासन जागे होणार की भैरोबाच्या कोपाची वाट बघणार, हाच यक्षप्रश्न भैरोबा भक्तांना पडला आहे.
