
सातारा (प्रतिनिधी ) : साताऱ्यातील सदरबाजार येथील निर्मला कॉन्व्हेंट स्कूलच्या व्यवस्थापनांकडून जातीनिहाय तुकडीमध्ये वर्गवारी केल्याचा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला असून जातीय विष पेरण्याचे काम शाळेच्या माध्यमातून होत आहे. विद्यार्थ्याच्या मनामध्ये जातीयद्वेष बिंबवला जात आहे. भारतात अखंड एकता आहे. धर्मनिरपेक्षता आहे. संविधनावर देश चालतो. याच देशात निर्मला कॉन्व्हेंटकडून चुकीचा निर्णय होत असून त्यांचे लाड आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार गाढवे यांनी दिला.
यावेळी शाळेच्या समोर आंदोलन करत शाळेच्या गेटलाच निवेदन चिटकावून नोटीस बजावण्यात आली. अचानक हिंदुत्ववादी संघटनांनी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सातारा शहर पोलीस ठाण्याचा मोठा बंदोबस्त शाळेच्या बाहेर होता. एपीआय शितोळे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
