सातारा -प्रतिनिधीसातारकरांचे श्रध्दास्थान व गडकरआळीचे ग्रामदेव असलेल्या पेढ्याचा भैरोबा परिसरात भक्तांबरोबर व्यायामासाठी येणाऱ्यांकडून श्रमदानातून वृक्षसंवर्धन,स्वच्छता ठेवली जाते.यातून मोठ्या प्रमाणावर वृक्षसंपदा वाढली असून आता ग्रामस्थांनी लोकार्पणातून मंदीराचा जीर्णोद्धारानंतर आता नगरपरिषदेने परिसर सुशोभित करण्यासाठी मोठ्या निधीची तरतूद करुन कामाला सुरुवात केली आहे. यावेळी मंदबुद्धी डोक्यातून सुशोभीकरण करताना भक्तांनी व ग्रामस्थांनी लावून वाढविलेल्या वृक्षांची तोड आणि लोकसहभागातून झालेल्या कामावर जेसीबी फिरवला आहे. सुशोभीकरणानंतर हा परिसर मद्यपी, विकृत चाळे करणारांची वर्दळ वाढून पावित्र्याची वाट लागणार अशी भिती भैरोबा भक्तांनी व्यक्त केली.

सातारा शहराच्या पश्चिमेस असलेल्या गडकर आळी आणि शाहुपुरीच्या डोंगरावर असलेल्या पेढ्याचा भैरोबाचे मंदिर आहे.हे मंदिर सातारा, गडकरआळी शाहुपुरी, करंजेकरांचे श्रध्दास्थान असून मनोकामना पूर्ण करणाऱ्या या भैरोबावर मोठ्या प्रमाणावर भक्तांची अपार श्रद्धा आहे. हवेशीर टेकडीवर विसावलेल्या पेढ्याच्या भैरोबाचे नियमित दर्शन आणि व्यायाम करण्यासाठी पहाटेपासून मोठी वर्दळ असते.इथे रात्री उशिरापर्यंत मद्यपान करणाऱ्यांचा वावर असून त्यांनी रिकाम्या केलेल्या बाटल्या, टाकलेला कचरा मंदीराचे पावित्र्य राखण्यासाठी भक्तांकडून व गडकर आळी गावठाण ग्रामस्थांकडून स्वच्छता केली जाते.तर अनेकांनी केलेल्या वृक्षसंवर्धनासह नियमित पाणी, खते दिली जातात.यामुळे झाडांना चांगलाच बहर आला आहे.

सातारा नगरपरिषदेने लाखों रुपयांच्या निधीतूनआता मात्र मंदिराच्या परिसरात सुशोभीकरणाचा डाव मांडला आहे. यासाठी बहरलेल्या झाडांची कत्तल केली जात आहे. सुशोभीकरण आणि जॉगिंग ट्रॅक साठी अनधिकृतपणे बेसुमार गौण खनिज उत्खनन केले जात आहे. श्रध्दास्थानाचा परिसर सुशोभित होणार असल्याने याबाबत वाच्यता केली जात नाही. पण भविष्यात हाच परिसर सुशोभित झाल्यावर मद्यपी आणि विकृत चाळे करणारांना आवर घालण्यासाठी नगरपरिषदेने कडक उपाययोजना सुद्धा करण्याची गरज आहे.अन्यथा लाखों रुपये खर्च करून केलेल्या जीर्णोद्धार आणि सुशोभीकरण वाया जाऊ नये, तेथे जॉगिंग ट्रॅक केल्यानंतर या मंदिराचे पावित्र्य जपले जाणार काय?, असा सवाल उपस्थित होत आहे. सुशोभिकरण झाल्यानंतर अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे. येथे सुरक्षेच्या दृष्टीने पालिका नेमकी काय उपाययोजना करणार की मंदिर परिसरात प्रेमी युगलांना मुक्त संचार करण्यासाठी अश्लिल चाळे करण्यासाठी पालिकेकडून सुशोभिकरण केले जात आहे, का ? असाही प्रश्न ग्रामस्थांना व सातारकरांना पडू लागलेला आहे.

म्हणे ९ हजार झाडे लावणार…

भक्तांसोबत नागरिकांनी श्रमदानातून वृक्षसंवर्धन केलेली झाडे कदाचित योग्य विभागाची परवानगी न घेताच काढून टाकली असणार आहेत. याबाबत विचारणा केली असता म्हणे की ९ हजार झाडे लावणार आहे. वयोमान अधिक असणारी झाडे तोडून नवीन झाडे लावणार असल्याची थाप आहे.कारण झाडांसाठी जिथे खड्डे काढलेले आहेत, तिथेच गवत ही उगवत नाही.फक्त घेतला ठेका म्हणून होऊ दे खर्च असा प्रकार आहे. याला जबाबदार प्रशासकीय अधिकारी आहेत.

  • गणेश पुजारी (ग्रामस्थ शाहूपुरी )

By Admin

You cannot copy content of this page