
सातारा – साताऱ्यात नगरपालिकेच्या हद्दीत विनापरवाना जाहिरात फलक लावण्यास सक्त मनाई आहे. पण नगरपालिकेचा अतिक्रमण विभाग जाहिरात कोणी लावली आहे, यावर कारवाई करतो. जिथे जाहिरात फलक लावण्यासाठी मनाई असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात नेत्यांचे फोटो लावून प्रसिद्धीसाठी चमकोगिरी करणाऱ्याने जाहिरात फलक लावला असताना अतिक्रमण विभागाकडून कारवाई केली नाही. घरो घरी तिरंगा ध्वज फडकविण्याचे आवाहन करणारा पालिकेचा फलक एका कोपऱ्यात आणि चमकोगिरी करणाऱ्याने जाहिरात फलक जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेशद्वाराला लावत जणू पालिकेचा पोकळ वट्ट दाखवून दिला आहे. यामुळे नगरपालिकेचा अतिक्रमण विभाग फक्त नावालाच असल्याची खमंग चर्चा साताऱ्यात ऐकू येऊ लागली आहे.
नगरपालिकेच्या हद्दीतील विनापरवाना जाहिरात फलक लावण्यास मनाई आहे.यासाठी प्रतीदिन निश्चित केलेले शुल्क भरून तो फलक लावता येतो. जर विनापरवाना जाहिरात फलक लावण्यास मालमत्ता विद्रुपीकरण अधिनियम १९९५ नुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरुन कायदेशीर कारवाई केली जाईल असा फक्त पोकळ दम देणारे काही फलक नगरपालिकेने शहरात लावलेले आहेत.पोकळ एवढ्यासाठी की लावलेल्या जाहिरात फलकावर ठराविक नेत्यांचे फोटो, राजकीय पक्ष , जेलवाऱ्या केलेले गुंड, रोज नव्या नेत्यांसोबत दिसणारे भुरटे पुढारी, हप्ते बहाद्दर, फायद्यापुरता संघटनेचा वापर करणाऱ्यांना जणू सुट दिली आहे.कारण अशांच्या फलकावर कारवाई करण्याचा पालिकेच्या अतिक्रमण विभागात तेवढा दम असणारा अधिकारी, कर्मचारी अजून तरी ऐतिहासिक साताऱ्याच्या पालिकेला लाभला नाही.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात बड्या नेत्यांचे फोटो लावून आपली चमकोगिरी करणाऱ्याने विनापरवाना जाहिरात फलक लावला आहे. तसात पालकमंत्र्यांशी सलगी असल्याचे वारंवार दाखविण्यासाठी त्यांच्या निवासस्थान परिसरातील चमकोगिरी करण्यासाठी विनापरवाना जाहिरात फलक लावले आहेत.मात्र यावर कारवाई केली जात नाही.सामान्य कोणी हे धाडस केले तर तो जाहिरात फलक हटवून दंडात्मक कारवाई करण्याचे मोठे धाडस दाखविले जाते.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जाहिरात फलक लावण्यास मालमत्ता विद्रुपीकरण अधिनियम १९९५ नुसार कायदेशीर कारवाई करण्यासाठी अतिक्रमण विभागाला जमतं नाही. यामुळे सातारा नगरपालिकेचा अतिक्रमण विभाग फक्त नावालाच उरला असल्याची साताऱ्यात चर्चा सुरू झाली आहे. मात्र अतिक्रमण विभागाचे कर्मचारी काखा फुगवून विनाकारण तमताना दिसतात, हे हास्यास्पद होऊ लागले आहे.
जॉंबाज अधिकारी हवा
सातारा शहर अतिक्रमण मुक्त करण्यासाठी कर्तव्यदक्ष आणि दम असणारे मुख्याधिकारी आणि अतिक्रमण विभाग प्रमुख पदी अधिकारी हवा आहे. शहरात फुकटात बॅनरबाजी, अतिक्रमणाचा विळखा वाढू लागला आहे.शहरात नेत्यांबरोबर त्यांच्या चेल्याची विनापरवाना चमकोगिरी जाहिरात बाजीवर नगरपालिकेकडून कारवाई केली जात नाही. यावर मालमत्ता विद्रुपीकरण अधिनियमाचा वापर करणारा जॉंबाज अधिकारी हवा आहे,हिच सातारकरांची उघड बोलताना ऐकू येऊ लागले आहे.

