सातारा(प्रतिनिधी) : दळणवळण क्षेत्रातील चालकांनी सुरक्षित वाहन चालविण्यासाठी अव्याहत कार्य करणाऱ्या वाहन संघटना, संयुक्त महासंघाकडून १७ सप्टेंबर हा चालक दिन साजरा केला जातो.या दिवशी सोलापूर येथे १९ जिल्ह्यातील चालकांमधून सातारचे रिक्षा चालक सुधीर साळेकर यांना चालक रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

देशभरात जवळपास १२ कोटी चालक असून त्यांच्या मध्ये सुरक्षेतेची सदैव जाणीव आणि विना अपघात सेवा द्यावी, यासाठी दर वर्षी १७ सप्टेंबर ला चालक दिन साजरा करण्यात येतो. यावर्षी सोलापूर येथील वाहतूक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद, कामगार नेते माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या उपस्थितीत १९ जिल्ह्यातील चालकांचा मेळावा पार पडला. यात विविध अवलोकन करून देण्यात आलेला “चालक रत्न” हा पुरस्कार सातारच्या माची पेठेतील रिक्षा चालक सुधीर साळेकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सुधीर साळेकर हे उच्चशिक्षित असून गेले ३७ वर्ष अविरतपणे आपला रिक्षा व्यवसाय अत्यंत जबाबदारीने व प्रामाणिकपणे निष्ठेने करत आहेत. रिक्षात विसरलेला प्रवाशाचा अतिशय महागडा मोबाईल तसेच सोन्याची दागिने असलेली पर्स त्यांनी परत केली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि व्यसनमुक्ती चळवळीतील ते सक्रिय कार्यकर्ते आहेत. रिक्षा चालकांच्या प्रश्नांवर विविध वृत्तपत्रांच्या माध्यमातून आवाज उठवत असतात. रिक्षा चालकांच्या गुणवत्ता प्राप्त मुलांचा गुणगौरव, कोरोना काळात स्वतः बाधित झाल्यानंतर सुध्दा अनेक बाधितांना आपल्या रिक्षातून त्यांनी सेवा आणि रिक्षा चालकांसाठी दिलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रियाझ भाई सय्यद, माजी आमदार आडम मास्तर यांचे हस्ते मानपत्र आणि सन्मानचिन्ह सन्मानित करण्यात आले.

By Admin

You cannot copy content of this page