
सातारा : सातारा शहरातील गडकर आळी ते अनंत इंग्लिश स्कूल रस्त्यावरील पूल पाडून वर्ष होत आले तरी या पुलाचे काम पूर्णत्वास जाण्याचे चित्र काही दिसत नाही. कामाची मुदत संपूनही ठेकेदार काम पूर्ण करीत नाही आणि मुदत पूर्ण झाल्यानंतरही पालिका मुख्याधिकारी ठेकेदारास का पाठीशी घालत आहेत? हे कोडे परिसरातील नागरिकांसह येथून ये-जा करणार्या प्रवाशांना पडले आहे.
याबाबत माहिती अशी, सातारा शहरातील गडकर आळी ते अनंत इंग्लिश स्कूल रस्त्यावरील ब्रिटीशकालीन पूल वाहतुकीस अपुरा पडत असल्याने तो सुमारे वर्षभरापूर्वी पाडण्यात आला. त्याठिकाणी मोठा भक्कम पूल होणार असल्याने परिसरातील नागरिकही सुखावले. काही दिवसांचा तर प्रश्न आहे. थोडे दिवस अडचण सोसली तरी काही फरक पडत नाही, हा विचार करुन तेथील नागरिकांनी ब्रिटीशकालीन पुलाला जमीनदोस्त होताना याची देही याची डोळा पाहिले.

ठेकेदाराने काही लाखांच्या या कामास सुरुवात केली. मात्र शाहूपुरी, गेंडामाळ परिसरातून मंगळवार तळे, अनंत इंग्लिश स्कूल कडे येणार्या प्रवासी, विद्यार्थ्यांना मात्र किती मोठ्या त्रासास सामोरे जावे लागेल, याची काही कल्पनाच नव्हती. यानंतर ठेकेदाराने जुना पूल पाडून ते काम जैसे थे ठेवण्यातच धन्यता मानली. मात्र याचा परिणाम परिसरातील व्यवसायिकांवरही झाला. त्यांचे धंदे बंद पडण्याची वेळ आली. कारण या रस्त्यावरुन जाणारे-येणारे प्रवासी, विद्यार्थीच त्यांचे मुख्य गिर्हाईक होते. येथील नागरिकांनाही फार मोठ्या असुविधेस सामोरे जावे लागत आहे. कारण अनंत इंग्लिश स्कूल दिशेला जाताना वा येताना त्यांना कोटेश्वर मंदिराला वळसा घालून आपले पेट्रोल जाळावे लागत आहे. मोठा वळसा पडल्याने विद्यार्थ्यांच्या शाळांच्याही वेळा चुकत आहेत. त्यानुषंगाने त्यांचे शैक्षणिक नुकसानही होत आहे.

ठेकेदाराला काम देताना त्याने ते विहित वेळेत पूर्ण करायचे असते. त्यानुसार तशी कागदपत्रेही तयार केली जातात. ठेकेदाराने काम वेळेत पूर्ण न केल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करुन त्याला काळ्या यादीतही टाकता येते. मात्र या पुलाच्या कामाबाबत ठेकेदाराचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. तसेच काम पूर्ततेची वेळ निघून गेल्यानंतरही सातारा पालिका मुख्याधिकार्यांनी या ठेकेदारावर काहीही कारवाई न करता एका बाजूने त्याला अभयच दिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हे साटेलोटे काय आहे, याचाही शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र ठेकेदार आणि मुख्याधिकार्यांच्या नादात येथील जनता मात्र भरडली जात आहे, एवढे मात्र नक्की.
