
सातारा : ना कुठे हत्ती- ना घोडे, ना लाइटिंग- ना डिजे, ना साधी मोटरसायकल रॅली… अहो साधा मंडप- पताका सुद्धा नाहीत! तरी शाहूपुरी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिवस्मृतींना अभिवादन करत अजिंक्यतारा किल्ल्यावर श्रमदान करून अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी केली.
त्याचं झालं असं, साताऱ्यातील शाहूपुरी माध्यमिक विद्यालयाचे प्रमुख भारत भोसले शिवजयंती दिवशी सुमारे 50 विद्यार्थ्यांना घेऊन अजिंक्यतारा किल्ल्याच्या मंगळाई टेकडीवर पोचले. हिंदवी स्वराज्याची चौथी राजधानी असलेला अजिंक्यतारा किल्ला. या ठिकाणी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुमारे एक महिना वास्तव्य होते. त्यामुळे शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा किल्ला आहे.
हरित सातारा या ग्रुप मार्फत अजिंक्यतारा च्या मंगळाई टेकडीवर गेले दोन वर्ष वृक्ष संवर्धनाचा उपक्रम राबवला जातो. या ठिकाणी सुमारे 1600 वृक्षांची लागवड व जोपासना केली जाते. वृक्ष संवर्धना बरोबरच वृक्ष संरक्षण, संगोपन आणि संवर्धनाबाबत लोक जागृती व्हावी यासाठी हरित सातारा ग्रुप काम करतो.
शिवजयंती निमित्त शाहूपुरी माध्यमिक विद्यालयातील सुमारे 50 विद्यार्थ्यांनी श्रमदान करत कॅनमधून पाणी वाहून नेऊन झाडांना घातले. आणि अभिनव पद्धतीने शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या भूमीला मानाचा मुजरा घातला. हरित साताराचे किरण कदम यांनी विद्यार्थ्यांसमोर ॲड. गोविंदराव पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकातील उताऱ्याचे वाचन केले.

यावेळी शाहूपुरी माध्यमिक विद्यालयातील शिक्षक प्रवीण दीक्षित, नवनाथ कांबळे, संजय बारंगळे, अजय भोसले, निशांत केंडे, माजी ग्रामपंचायत सदस्य शोभा केंडे, प्रितम जाधव, माधव मैडीगीरी, पार्थ सचिन मिरजकर, कोमल उरणकर, ऋषिकेश जांभळे, महेश जांभळे, रघुनाथ बाबर, सिद्धी करंजे, सर्वेश बहुलकर, शार्वी बहुलेकर तसेच हरित साताराचे राजेश पुराणीक, अंकुश मांडवकर, विनिता गोखले, भालचंद्र गोताड, दिलीप भोजने, ओमकार नारकर, संजय मिरजकर, अमोल कोडक, जगदीश कोष्टी, प्रगती पाटील आदी या उपक्रमात सहभागी झाले होते.

कर्तव्यपूर्ती
हरित सातारा ग्रुपचे सदस्य विकास बहुलेकर यांच्या मातोश्री श्रीमती प्रमिला बहुलेकर यांचे दोन दिवसापूर्वी निधन झाले. आपल्या मातोश्रींच्या स्मृती प्रित्यर्थ विकास बहुलेकर व कुटुंबीयांनी टेकडीवर पाच झाडांचे रोपण केले. तसेच टेकडीवरील १० झाडांना आठवड्यातून एकदा दत्तक पालक म्हणून पाणी घालण्याची जबाबदारी बहुलेकर कुटुंबीयांनी स्वीकारली.
