
लिंब.. अपुऱ्या वेतनावर संसाराचा गाडा चालवणाऱ्या राज्यातील कलेच्या विविध पदविका व प्रमाणपत्र असे अभ्यासक्रम चालवणाऱ्या कला महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना दैनंदिन जीवनात असंख्य समस्यांना वर्षानुवर्ष सामोरे जावे लागत आहे, एकेकाळी चित्रकलेला तसेच कला – संस्कृतीला राजाश्रय लाभला होता परंतु सध्याच्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात या शिक्षकांवर उपासमारीचे संकट कोसळले आहे, राज्य सरकारने याबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे अपेक्षित आहे कला संस्कृतीला चालना देऊन आपल्या भारतीय संस्कृतीचे जतन या माध्यमातून होणे गरजेचे आहे यासाठी कला महाविद्यालयातील शिक्षकांना वेतन अनुदानाचा आधार मिळणे खूप गरजेचे आहे यासाठी राज्य सरकारने राज्यातील कलेचे उच्च शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांना अनुदान देणे क्रमप्राप्त आहे, अद्याप 171 विनाअनुदानित कला महाविद्यालये अनुदानापासून वंचित आहेत त्यांना अनुदान देऊन राज्य सरकारने या शिक्षकांचे जीवन प्रकाशमय करावे.
सध्या राज्यात 31 कला महाविद्यालये अनुदानित आहेत या दृष्टीने पाहिले असता अनुदानित महाविद्यालयांच्या विद्यार्थी संख्येपेक्षा तिप्पट संख्येचे विद्यार्थी घडवण्याचे काम विनाअनुदानित कला महाविद्यालय करीत आहे ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे.
राज्याचे कलासंचालनालय ,मुंबई अंतर्गत राज्यभरातील कला महाविद्यालयात कार्यरत असणारे असंख्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत या शिक्षकांनी आजवर अनेकदा मंत्रालय स्तरावर तसेच कलासंचालनालय स्तरावर पाठपुरावा करूनही त्यांना अद्याप न्याय मिळाला नाही अनेक सरकारे आली आणि गेली प्रत्येक सरकारने त्यांना आश्वासनावरच बोळवण केली राज्यातील कला महाविद्यालयातील जवळपास 800 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी गेल्या 33 वर्षापासून यासंदर्भात लढा देत आहेत परंतु या लढ्याला अद्याप यश प्राप्त झालेले नाही ही अत्यंत दुर्देवी बाब आहे.
प्रत्येक सरकार कलाक्षेत्राच्या विकासासाठी प्रयत्नशील असताना या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या शिक्षकांकडे दुर्लक्ष का? असा प्रश्न आता या शिक्षक वर्गाकडून व्यक्त केला जात आहे एकीकडे राज्य सरकार कलेला प्रोत्साहन देण्यासाठी लाखो रुपये विविध कला व सांस्कृतीक कार्यक्रमांवर खर्च करते परंतु कलेची साधना करणाऱ्या, जोपासणाऱ्या, कला जोपासली जावी म्हणून नवनवीन भावी कलाकारांची पिढी घडवणाऱ्या शिक्षकांकडे मात्र दुर्लक्ष करते हे सध्याचे वास्तव चित्र आहे. सन 1993 पासून मान्यताप्राप्त कला महाविद्यालयातील शिक्षकांनी अनुदानाबाबत सातत्याने पाठपुरावा तसेच अनेकदा आंदोलने, मोर्चे त्याचप्रमाणे उपोषणे करून सुद्धा शासनाने याकडे सोईस्कर दुर्लक्ष केले आहे राज्यातील 171 महाविद्यालयामध्ये काम करणारे शिक्षकांचे वेतन हे वेळेत व नियमित होत नसल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येत आहे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, चंद्रकांत दादा पाटील यांनी तरी आता यात पुढाकार घेऊन गेली 33 वर्षापासून प्रलंबित असलेला अनुदानाचा प्रश्न मार्गी लावावा अशी अपेक्षा शिक्षक वर्गातून व्यक्त केली जात आहे.
अनुदानाबाबत कलासंचालनालयामार्फत राज्यातील 171कला महाविद्यालयातील तपासणी दर तीन-चार वर्षांनी केली जात आहे प्रत्येक वेळी या शिक्षकांना नजीकच्या काळात महाविद्यालयांना अनुदान मिळणार अशा आशेवरती आजपर्यंत ठेवलेले आहे, महाविद्यालयातील इन्स्पेक्शन झाल्यावर शिक्षकही आता आपल्याला अनुदान मिळेल या आशेवरती या ठिकाणी वर्षानुवर्षे काम करीत असतो मात्र इन्स्पेक्शन झाल्यानंतर पुढे काय होते हे मात्र या शिक्षकांना अद्याप पर्यंत समजत नाही. 1993 पासून सातत्याने या महाविद्यालयांची इन्स्पेक्शन होत असून अद्याप अनुदान प्राप्त न झाल्याने आता या शिक्षकांना आपल्या भवितव्याची चिंता वाटू लागली आहे गेली 33 वर्षापासून सातत्याने लढा देणाऱ्या या शिक्षकांनी न्यायाची अपेक्षा कोणाकडून करावी? असा प्रश्न आता त्यांच्यापुढे पडला आहे, यातच भर म्हणून नुकतेच महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाची आनाठायी निर्मिती करून परंपरागत उच्च दर्जाचे विविध कला पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचे अवमूल्यन करून महाविद्यालयांपुढे तसेच भावी कला विद्यार्थ्यांपुढे सद्या मोठे संकट निर्माण केले गेले आहे, शैक्षणिक वर्ष 25- 26 मध्ये पुर्वीचेच पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रम योग्य असून NEP च्या दृष्टीकोनातुन ते यथायोग्यपणे सुधारित करून लागू करणे ही सार्वत्रिक अपेक्षा कला वर्तुळातून सद्या व्यक्त केले जात आहे, सध्या नव्याने तयार होणारे किंवा लागू केले जाणारे पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रम हे भविष्यात उच्च कला शिक्षणाचे अवमूल्यन करणारेच ठरतील याबाबत शासन व कला संचालनालय यांची भूमिका सुधारणावादी नुसून अतिशय हेकेखोरआढळते आहे.
कला साधनेची जपणूक करणाऱ्या कला संस्कृतीचे जतन करणे ही काळाची गरज आहे यासाठी राज्य सरकारने याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे कला संस्कृतीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहता तसेच कलेचे संवर्धन करणाऱ्या शिक्षकांच्या मानसिकतेचा विचारही या निमित्ताने होणे गरजेचे आहे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना कला शिक्षणातून सामर्थ्यवान बनवणाऱ्या शिक्षकांच्या पदरी मात्र सातत्याने निराशा येत आहे इतरांचे जीवन प्रकाशमय करणाऱ्या शिक्षकांचे जीवन मात्र अंधारमय झाले आहे… चौकट.. राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस हे कलारसिक आहेत त्यांच्याकडून कला महाविद्यालयातील शिक्षकांच्या खूप अपेक्षा आहेत गेली 33 वर्ष अनुदानासाठी झगडणार्या शिक्षकांना एक आशेचा किरण या निमित्ताने दिसत आहे त्यांनी या प्रश्नात लक्ष घालून गेले 33 वर्ष रखडलेला अनुदानाचा प्रश्न मार्गी लावावा अशी अपेक्षा राज्यातील कला शिक्षकांची आहे मंत्रालयाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागात धुळखात पडलेल्या 171 महाविद्यालयाच्या अनुदान मिळणेबाबत च्या प्रस्तावांबाबत योग्य तो निर्णय त्यांनी घ्यावा अशी मागणी राज्यातील कला महाविद्यालयातील शिक्षकांची आहे…
– श्रीरंग काटेकर
(जनसंपर्क अधिकारी गौरीशंकर नॉलेज सिटी लिंब सातारा..)
*लेखक शैक्षणिक क्षेत्रात 36 वर्ष होऊन अधिक काळ कार्यरत आहेत*.
