सातारा : मागील भागात आपण अमर्‍या देशमुखाची दोन नंबरच्या धंद्यात बाल्यावस्थेतील गंडवागंडवी पाहिली. आता आपण पाहूयात बाळाने जरा पैसा हाती खुळखुळायला लागला की केलेले कारनामे…

आमर्‍या देशमुखाने वृद्धाची फसवणूक केलीच, शिवाय त्या वृद्धाच्या परिवारालाही वृद्धाच्या मृत्यू पश्‍चात वृद्धाच्याच मालकीच्या असलेल्या जमिनीचा कोणताही लाभ दिला नाही. त्या परिवाराला आर्थिक चणचणीमुळे घरातील महत्त्वाच्या कामांनाही मुकावे लागत आहे. असे असले तरी आमर्‍याच्या काळजाला कोणतीच भावना शिवली नाही. तो आपला निगरगट्टच… आपण भला, आणि आपण घाणेरड्या कृत्यातून दुसर्‍याशी लबाडी करुन मिळवलेला पैसा भला, याच विश्‍वात हा विलासी जीव जगत आला.आता अशी लॅविश लाईफ जगत असतानाच त्याला आणखी पैसे कमवण्याची उर्मी उफाळून आली. त्यातून त्याला एक जाणीव झाली. पैसा आल्यामुळे जरा बर्‍यापैकी ओळखी झालेल्या होत्या. त्या ओळखींचे रुपांतर पैशात कसे करायचे, याची गणिते तो तयार करु लागला. यातून याच्या सडक्या मेंदूतून एक भन्नाट कल्पना आली.

माजी पालकमंत्र्यांचे त्यांचे खूप दूरवरुन नातेसंबंध असल्याचा तो गैरफायदा घेवू लागला. यातून त्याने लायझनिंग करायला सुरुवात केली. तुमचे काम करुन देतो, मात्र माझी टक्केवारी द्यावी लागेल, अशी बेमालूम फसवेगिरी करुन तो सावजांना टिपायला लागला. आता पालकमंत्रीच मामा आहेत, म्हटल्यावर कुळेही मिळायला लागली. त्या कुळांकडून मग मोठ-मोठ्या रकमा उचलून हा बहाद्दर जिवाची मुंबईच नाही तर दिल्लीही करु लागला. कुळांकडून आलेल्या पैशांचा विनियोग तो येथेच्छपणे ललनांवर उधळून करायचा. हजाराची वस्तू लाखात गेली तरी चालेल, पण कुठे काही कमी पडायला नको, याची काळजी तो अगदी व्यवस्थित घ्यायचा. कारणही तसेच होते. कारण कुठे घामाचा पैसा होता तो? त्यामुळे ललनांना महागड्या भेटवस्तू देणे, त्यांचे चोचले पुरवणे, याकडे त्याचा कटाक्ष. कारण या बहाद्दराला गंडवण्याच्या धंद्यातील एक गमक कळले होते. ते हे की, आपण जर कोणते व्यसन केले तर आपण बेहकून सत्य बोलू शकतो. त्यामुळे त्याने कितीही मोह झाला तरी इतर व्यसनांकडे पाठच फिरवली होती. हा एक त्याचा चाणाक्षपणाच मानावा लागेल.हे सर्व सुरु असताना कुळांना त्याने फारकत दिली नाही. कारण शेवटी ते त्याचे ब्रेड आणि बटर होते. ते सोडून चालण्यासारखे नव्हते. त्याला हेही कळून चुकले होते की, जरी कोणाचे काम केले नाही तरी आपल्यावर कोणत्याच प्रकारची कारवाई होवू शकत नाही. कारण जे त्याला कामे सांगत, ती कामे कधीच वैध नसणार… आणि मिळतात ते पैसेही ब्लॅक मनीच असणार. त्यामुळे देणारा व्यक्ती पोलिसांना काय सांगणार? हे ट्रान्झेक्शन तो कसे दाखवणार? हे जाणून त्याने येणार्‍या लक्ष्मीला कधीच नाही म्हटले नाही. जी कामे आवाक्यात येणारीही नव्हती, त्यालाही त्याने ‘हो’ म्हणून समोरच्याकडून लाखो काढले.

लाखोंचा अधिपती झाल्यानंतर काम देणारेही त्याच्या नावाने शंख करायला लागले. त्याचा मोबाईल कंटिन्यू खणखणू लागला. काम देण्यासाठीही आणि कामाचे काय झाले, याची विचारणा करण्यासाठीही. काम देणार्‍यांना तो टाईम द्यायचा. मात्र काम देवून बराच काळ लोटला तरी काम होत नाही, असे पाहून चिडलेल्या गिर्‍हाईकांना तो, तुमच्याच कामासाठी हासुरण्यात आलोय. साहेब फ्रेश होताहेत, तुमचाच विषय काढणार आहे, काळजी करु नका. साहेबांचे एक मोठे काम आहे. त्या कामाचा आवाका मोठा असल्याने इतरही लोकांना बोलावून घेतले आहे. तुम्ही फक्त अधिक पैशांची सोय करुन ठेवा. आपले काम झालेच म्हणून समजा, अशी मल्लिनाथी तो इतरांना करत असे. ही त्याची मोडस प्रत्येकवेळेस कॅशच व्हायची. कारण संभाषण कौशल्य अगदी उपजतच.

लोकांच्या नसा अगदी परफेक्ट या भामट्याला माहित. त्यामुळे पैसे दिले की आपले काम झालेच म्हणून समजा, अशी भावना तो काम देणार्‍यांच्या मनात बिंबवत असे. कॅश देणाराही पैसे दिल्यानंतर अगदी आपले काम झालेच आहे, अशा अविर्भावात आपले घर वा मद्यालय गाठत असे.आमर्‍याचे हे उद्योग अगदी बेमालूमपणे सुरु होते. आमर्‍याची ट्रेन सुसाट होती. दुनियेत मुर्खांची कमतरता नाही, एकाला शोधा हजारो सापडतील, या उक्तीचा फायदा उचलत आमर्‍या मोठा होतच आहे. मात्र यामध्ये उल्लेखनीय बाब ही म्हणता येईल, की पोलीस प्रशासनाला ही गंडवागंडवी माहित असूनही त्यांना काहीच करता येत नाही. कारण त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करणाराच कोणी नाही. मात्र, तरीही पोलीस प्रशासनाने त्याची सर्व ट्रान्झेक्शन्स पडताळली तर यातून खूप मोठे घबाड हाती येण्याची शक्यता नाकारता येत नाही. गरज आहे ती पोलीस प्रशासनाकडून फक्त अशा भामट्यांना जेलमधील फुकटची चपाती खायला लावणार्‍या मानसिकतेची.

(क्रमश:)तिसरा भागही लवकरच येईल, आपल्या भेटीला…

By Admin

You cannot copy content of this page