सातारा– शालेय विद्यार्थिनींना लक्ष करून त्यांचा पाठलाग करणे व छेडछाड करण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असून यामुळे शालेय स्तरावरील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

विज्ञान-तंत्रज्ञानाने केलेली प्रगती व यामुळे निर्माण झालेल्या सोयी सुविधामुळे क्षणात एकमेकांच्या सहजपणे संपर्कात येण्यासाठी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे.सोशल मीडियाच्या जमान्यात विद्यार्थी विद्यार्थिनींना आकर्षित करण्याचे एक माध्यम म्हणून मोबाईलच्या रूपाने प्राप्त झाल्याने या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.शालेय विद्यार्थिनींनी आता या पुढील काळात अधिक सावधगिरी बाळगणे गरजेचे बनले आहे.यासाठी आपल्या आजूबाजूला घिरट्या घालणाऱ्या तरुणाई बाबतची माहिती आपल्या कुटुंबियांना अथवा शालेय प्रशासनांना देणे आवश्यक आहे.

सातारा शहरातील मागील काही वर्षांपासून अशा टोळभैरवी टोळ्या कडून शालेय विद्यार्थिनींना नाहक त्रास देण्याचे प्रमाण वाढले आहे.विशेषता शालेय परिसरात या टोळभैरवी ची साखळी मोठ्या प्रमाणात असल्याने बऱ्याच विद्यार्थिनींना या टोळ्यांच्या दहशतीला सामोरे जावे लागते.आपली नाहक बदनामी होईल या भीतीपोटी या मुली आपल्या कुटुंबापर्यंत ही माहिती देत नाही.परिणामी अशा प्रवृत्तींना यामुळे बळकटी मिळते.सातारा शहरात यापूर्वी अनेक अल्पवयीन मुलींची छेडछाड व विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत.या घडलेल्या घटनेतून सर्वांनीच खरे तर बोध घ्यायला हवा.विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत सातारा पोलीस दलाच्या निर्भया पथक मार्फत शाळा महाविद्यालय स्तरावर याबाबतचे प्रबोधन जनजागृती व मुलींनी सुरक्षिततेची काळजी कशी घ्यावी याबाबत नेहमीच मार्गदर्शन या विभागामार्फत केले जाते. तसेच शालेय परिसरात टोळभैरवींना दहशत बसावी म्हणून पोलीस दलाकडून पोलीस ग्रस्तही घालण्यात येत असते. तरीही अनेक ठिकाणी मुलींच्या छेडाछेडीच्या घटना घडत आहेत.

साताऱ्यात नुकतीच घडलेल्या घटनेने पालकांचे मन सुन्न झाले असून एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी एकतर्फी प्रेम करणाऱ्या प्रियकरानी अल्पवयीन मुलीच्या गळ्याला चाकू लावण्याची घडलेली घटना सर्वच पालकांसाठी एक चिंतेचा विषय बनला आहे. सातत्याने घडणाऱ्या या घटनेमुळे विद्यार्थिनी व पालक वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.याचा विद्यार्थिनींच्या मानसिकतेवरही परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. सातारा शहरात घडलेली ही घटना निश्चित निंदनीय असून संबंधितावर कठोर कारवाई व्हावी अशी पालक वर्गातून मागणी होत आहे.

अल्पवयीन मुले मुली सोशल मीडियाच्या जमान्यात भरकटत चालली आहेत. त्याचा दुष्परिणाम तरुणाईच्या मनावर खोलवर होत आहे. भावनिक ओढीपोठी व एकतर्फी प्रेम करण्याचे प्रमाण हे वाढत चालले आहे. याबाबत अल्पवयीन मुला मुलींना समुपदेशन ची नितांत गरज आहे.तरुण वयात शरीर रचनेत घडणारे बदल व यावर नियंत्रणाबाबत त्यांना अधिक सजग करणे काळाची गरज आहे.

मुलींच्या छेडछाडी घटनेकडे सर्वच घटकांनी गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. याबाबत पालकांनीही आपल्या पाल्याच्या दैनंदिन हालचालीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.आपल्या पाल्याच्या शैक्षणिक गुणवत्तेबाबत जसे अधिक सजग असतो तसेच आपल्या पाल्याच्या वर्तणूक बाबत ही तितकेच दक्ष राहणे आवश्यक आहे. अल्पवयीन वयात निर्माण होणारी विकृत प्रवृत्ती भविष्यात घातक ठरते याची जाणीव ही विद्यार्थ्यांना करून देणे गरजेचे आहे.

धावपळीच्या युगामध्ये पालकांना आपल्या पाल्याकडे लक्ष द्यायला वेळच नाही परिणामी बऱ्याच कुटुंबात सुसंवादाच्या अभावामुळे पाल्य पालकांशी हितगुज साधत नाही. त्यामुळे अल्पवयीन मुलाच्या मनावर परिणाम होत असल्याचे मानसिक उपचार तज्ञ डॉक्टरांचे मत आहे. आपल्या पाल्याशी सुसंवादाचे नाते असेल तरच आपला पाल्य आपल्या मनातील भावना व अडचणी व्यक्त करू शकेल. सोशल मीडियाच्या कार्यकाळात भावनांचे महत्त्व कमी झाल्याने कुटुंबामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्याचाही परिणाम विद्यार्थ्यांच्या मनावर होत असतो…

श्रीरंग काटेकर, सातारा

By Admin

You cannot copy content of this page