वाई : लोकसभा निवडणुकीचा ज्वर दिवसेंदिवस वाढत आहे. उन्हाळ्याची तीव्रताही वाढत आहे. अशा परिस्थितीत ही उमेदवार हे मतदारांना भेटण्याचे आटोकाट प्रयत्न करत आहेत. सकाळची वेळ आणि संध्याकाळपासून प्रचाराची मुदत असेपर्यंत उमेदवार हे मतदारांना गाठण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. दिवस कमी आणि दौरे जास्त असल्याने निर्धारित वेळेपर्यंत सभेच्या स्थळावर पोहोचणे अनेकदा अवघडहोते. वाई तालुक्यात अशीच वेळ भाजप व मित्र पक्षांचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यावर आली. मात्र मतदारांपर्यंत पोहोचण्याची उदयनराजेंची तळमळ हीमतदारांच्या दृष्टीने कौतुकाची बाब ठरली.
त्याचं झालं असं, वाई तालुक्यातील पसरणी येथे उदयनराजे भोसले यांची प्रचार सभा होती. वेळ सायंकाळ नंतरची, उदयनराजे एका विवाह समारंभात व नंतर कार्यकर्ते नेत्यांच्या गाठीभेटीत व्यस्त होते. पसरणी येथील सभेची वेळ होऊन गेली होती. मात्र सभेच्या ठिकाणी पोहोचणे देखील अवघड झाले होते. वेळपुढे सरकत होती. उदयनराजे यांचे कार्यकर्ते विकास शिंदे विजय नायकवडी तसेच आरपीआयचे नेते अशोक बापू गायकवाड यांनी उदयनराजे येईपर्यंत दमदार भाषणांनी सभेची खिंड लढवली. त्यांचे येणे जसजसेअवघड आणि अशक्य होत आहे, हे लक्षात आल्यावर स्वतः उदयनराजे यांनी शक्कल लढवली. तंत्रज्ञानाचा आधार घेत त्यांनी मोबाईल वरून सभा घेण्याची ठरवले.पसरणीच्या कार्यकर्त्यांनी तशी व्यवस्था केली, आणि उदयनराजे यांनी उपस्थित जनसमुदायास संबोधित केले.
वाईकर मंडळींशी मोकळेपणाने संवाद साधत उदयनराजे यांनी वाईचा विकास वाईची, एमआयडीसी या महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. रोजगार निर्मिती, कृषी विषयक उपक्रम हळद, आले संशोधन व प्रक्रिया उद्योग वाईत उभारण्याचे ठोस आश्वासन यावेळी उदयनराजे यांनी उपस्थितांना दिले. एकूणच उदयनराजे भोसले यांची एक झलक पाहण्यासाठी त्यांचे भाषण ऐकण्यासाठी उत्सुक असणाऱ्या कार्यकर्ते आणि मतदारांना भेटण्यासाठी उदयनराजे यांनी केलेली धडपडमतदारांबद्दल त्यांची आस्था आणि प्रेम स्पष्ट करणारी होती. त्याचबरोबर कार्यकर्त्यांच्या दृष्टीने ती कौतुकाची बाब होती.
