
सातारा शहरातील शाहूपुरी येथील गेंडामाळ नाका परिसरात वाढलेल्या टपऱ्या व हातगाड्यांच्या अतिक्रमणामुळे ज्येष्ठ नागरिकांसह ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या अतिक्रमणामुळे मंडई, मंदिर, वॉकिंग ट्रॅक तसेच परिसरात ये-जा करताना नागरिकांना जीव मुठीत धरून जावे लागत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
क्रांती सहकारी गृहनिर्माण संस्था, करंजे (ता. जि. सातारा) यांच्या वतीने तसेच शाहूपुरी परिसरातील ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थांच्या वतीने या समस्येबाबत सातारा नगरपालिकेत नगराध्यक्ष अमोल मोहिते यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात गेंडामाळ नाका परिसरातील अतिक्रमण तात्काळ हटवून नागरिकांना सुरक्षित व मोकळा रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याने प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
या वेळी क्रांती सहकारी गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
