
सातारा : आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने गाव पुढार्यांची लगबग दोन्ही वाड्यांवरती लागलेली असताना मागे मात्र आपल्याच गावात काय घडते आहे, ते पाहायला या इच्छुकांना वेळ नाही. या अनुषंगाने ग्रामस्थही या इच्छुकांचे टांगे पलटी केल्याशिवाय राहणार नाहीत, हे निश्चितच मानावे लागेल.
महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल लागले. आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे साहजिकच प्रत्येक गट आणि गणातील गाव पुढारी हा जिल्हा परिषद सदस्य व सभापती होणार असल्याची स्वप्ने रंगवू लागला आहे. जिथे महिला आरक्षण पडेल, तिथे घरातील महिलांना उभे करून त्यामागे आपली सत्ता निर्माण होण्याची दिवास्वप्ने पाहू लागला आहे. मात्र हे करत असताना आपण गावासाठी किंवा तेथील स्थानिकांसाठी नक्की काय केले, याचा शोध घेण्याचा हे इच्छुक प्रयत्न करताना दिसत नाहीत.

जकातवाडी हे सातारा तालुक्यातील शेंद्रे गटातील एक छोटेसे गाव. मात्र या छोट्याशा गावात निवडणुकीच्या धुमाऱ्यांमध्ये गावातीलच एका व्यक्तीचे घर फोडले जाते, तिथे लिंबा-नारळाचा उतारा ठेवला जातो आणि तोही एकदा नाही तर दोन वेळा. याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रारही देण्यात आली आहे. कालांतराने या प्रकरणातील गुन्हेगारही सापडेल. मात्र जे गावाच्या प्रश्नासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यत्वाची स्वप्ने पाहत आहेत, त्यांना गावातीलच हा प्रकार माहिती नसेल, असे शक्य वाटत नाही. याबाबत संबंधित पीडितांची भेट घेऊन त्यांना धीर देणे, अथवा त्यांच्या पाठीशी उभे राहणे तसे पाहायला गेले तर या गाव पुढार्यांचे मुख्य काम आहे. मात्र तसे न होता वाड्यांवर शक्तिप्रदर्शन करून मीच कसा चांगला आहे, हे दाखवण्याचा पोकळ उपद्व्याप हे लोक करताना दिसत आहेत.
त्यातच या गावात दोन मातब्बर प्रतिस्पर्धी उभे ठाकल्याने पक्षश्रेष्ठीं समोर सुद्धा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. त्यातूनच गावातील एकजण एका गटाला पाठिंबा दाखवून आपल्याच बायकोला उभे करणार असल्याचेही समजत आहे. म्हणजे दोन बोक्यांच्या भांडणात लोण्याचा गोळा तिसरीकडेच जाणार, असे दिसून येत आहे. दरम्यान, इच्छुकांच्या या भाऊगर्दीत सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कोणीही माईचा लाल पुढे येताना दिसत नाही आणि हेही सर्व गाव पाहत आहे, हे इच्छुकांनीही विसरता कामा नये. आत्ताच्या विज्ञान युगात लिंबा नारळांनी जर काय होत असते, तर युद्धे झालीच नसती असे म्हटले जाते. काही अंशी ते बरोबरही आहे. मात्र गावातील स्थानिकांचे प्रश्न सोडवायचे सोडून आपणच कसे लायक आहोत, हे दाखवण्यासाठी प्रत्येक जण झगडत आहे. पण शेवटी म्हणतात ना की, ये पब्लिक है सब जानती है…
