
सातारा:सातारा शहरात कुरिअरमार्फत सोने घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला मारहाण करून २१ तोळे सोने लुटणाऱ्या मध्यप्रदेशातील सराईत टोळीला सातारा शहर गुन्हे शोध (D.B.) पथकाने अवघ्या १२ तासांत बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी ५ आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून लुटीचे संपूर्ण सोने, गुन्ह्यात वापरलेली चारचाकी आणि मोबाईल असा एकूण ४५ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १२:३० च्या सुमारास सातारा शहरातील पंचायत समितीसमोर ही घटना घडली. कुरिअर कंपनीचे सोने घेऊन जाणाऱ्या एका इसमाला चारचाकी वाहनातून आलेल्या चौघांनी अडवले. आरोपींनी त्यास बेदम मारहाण करून सोन्याची बॅग जबरदस्तीने हिसकावून नेली आणि अंधाराचा फायदा घेऊन पळ काढला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती.
तपासाचे चक्र आणि थरारक पाठलाग घटनेचे गांभीर्य ओळखून सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर आणि उपविभागीय अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के व सचिन म्हेत्रे यांनी तात्काळ तपासाच्या सूचना दिल्या.डी.बी. पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि बातमीदारांच्या मदतीने संशयितांची माहिती मिळवली. चोरटे जिल्ह्याबाहेर पळून जात असल्याचे लक्षात येताच सातारा पोलिसांनी इतर जिल्ह्यांना सतर्क केले.
धुळे जिल्ह्यात पकडले
सातारा पोलिसांनी आरोपींचा पाठलाग सुरू ठेवला. धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहर पोलिसांच्या मदतीने नाकाबंदी करून या पाचही आरोपींना ताब्यात घेण्यात आले.जप्त केलेला मुद्देमाल पोलिसांनी आरोपींकडून खालील ऐवज जप्त केला आहे:२१ तोळे सोने (लुटलेला संपूर्ण माल)एक चारचाकी वाहन (गुन्ह्यात वापरलेले)मोबाईल संच(एकूण किंमत: ४५,००,०००/- रुपये) तपास पथकाचे कौतुकही यशस्वी कामगिरी सातारा शहर डी.बी. पथकाचे अविनाश माने, सुधीर मोरे, निलेश यादव, सुजित भोसले, प्रवीण कडव, पंकज मोहिते, तुषार भोसले, विक्रम माने, आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सायबर पोलीस ठाणे व शिरपूर पोलिसांच्या मदतीने केली. अवघ्या १२ तासांत परराज्यातील टोळीला जेरबंद केल्याबद्दल सातारा पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
