
सातारा:सातारा शहराच्या शैक्षणिक आणि औद्योगिक वैभवात आता मोठी भर पडणार आहे. नामदार बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या संकल्पनेतून, महाराष्ट्र शासन, टाटा टेक्नॉलॉजी आणि सातारा नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने शाहूपुरी (चोरगे मळा) येथे CIIIT (Center for Invention, Innovation, Incubation and Training) ट्रेनिंग सेंटर सुरू होणार आहे.
जागेची प्रत्यक्ष पाहणी व नियोजनाला वेगया प्रकल्पाच्या पूर्वतयारीसाठी आज सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष अमोल मोहिते आणि टाटा टेक्नॉलॉजीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शाहूपुरी येथील नियोजित जागेची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी उपनगराध्यक्ष डी.जी. बनकर, अविनाश कदम, सभापती शंकर किर्दत, नगरसेवक विश्वजीत बालगुडे, अक्षय जाधव, आरोग्य सभापती धनंजय जांभळे, आणि सभापती अशोक शेडगे यांच्यासह पालिकेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
हे ट्रेनिंग सेंटर केवळ एक इमारत नसून साताऱ्यातील तरुणांच्या भविष्यासाठी एक मोठी संधी ठरणार आहे:अद्ययावत प्रशिक्षण: टाटा कंपनीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे तांत्रिक शिक्षण मिळेल.
कौशल्य विकास:
पदवी किंवा पदविका शिक्षणानंतर उद्योगांना आवश्यक असणारे नेमके कौशल्य, आत्मसात करता येईल.या सेंटरमुळे साताऱ्यातील तरुणांना मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी मिळवण्याच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील.
“साताऱ्यातील तरुणांना शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीसाठी वणवण करावी लागू नये, त्यांना स्थानिक पातळीवरच जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळावे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. लवकरच हे सेंटर कार्यान्वित होईल.”— अमोल मोहिते (नगराध्यक्ष, सातारा)
शाहूपुरी परिसरातील या केंद्रामुळे साताऱ्याच्या औद्योगिक नकाशावर एक वेगळी ओळख निर्माण होणार असून, स्थानिकांमधून या निर्णयाचे जोरदार स्वागत होत आहे
