सातारा : प्रभाग क्रमांक ७ मधील महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमात बिग बॉस फेम जान्हवी किल्लेदार आणि प्रसिद्ध अभिनेते ओम यादव यांची धमाकेदार एन्ट्री झाल्याने उपस्थितांचा आनंद द्विगुणीत झाला. या दिमाखदार सोहळ्यात विजेत्या महिलांना मानाची पैठणी आणि आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे बांधकाम मंत्री ना. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी सातारा पालिकेचे नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्यासह विविध प्रभागातील नगरसेवक, नगरसेविका आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रभाग ७ मधील महिलांसाठी नगरसेविका सौ. वनिता विक्रम शिंदे आणि भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष प्रतीक शिंदे व मित्र परिवाराच्या वतीने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात जान्हवी किल्लेदार यांनी महिलांशी संवाद साधत खेळांचा आनंद घेतला. ओम यादव यांच्या उपस्थितीने कार्यक्रमात एक वेगळीच रंगत भरली. महिलांनी विविध खेळ आणि सांगीतिक कार्यक्रमांचा मनमुराद आस्वाद घेतला.मानाची पैठणी अन् बक्षिसांची लयलूटहोम मिनिस्टरच्या या चुरशीच्या स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या महिलांना पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच सहभागी आणि विजेत्या महिलांना विविध आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या.
आपल्या लाडक्या कलाकारांना प्रत्यक्ष भेटायला मिळाल्याने आणि खेळांच्या माध्यमातून विरंगुळा मिळाल्याने महिलांनी आयोजकांचे आभार मानले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रतीक शिंदे मित्र परिवाराने विशेष परिश्रम घेतले.सातारा शहरातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे हा सोहळा शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.
महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद हीच आमच्या कामाची पावती आहे. अशा उपक्रमांतून प्रभागातील स्नेहबंध अधिक घट्ट होतात.” – प्रतीक शिंदे (शहराध्यक्ष, भाजप)