
राजमुद्रा न्यूज नेटवर्क (सातारा) : सातारा शहर आणि उपनगर परिसरातील काही कॅफे आणि लॉजेसवर देहव्यापाराचे अवैध धंदे राजरोसपणे सुरु असून याबाबत अनेक संघटनांनी अनेकदा आवाज उठविला होता. याची पोलीस प्रशासनाने दखल घेत कारवाई देखील केली. परंतु सातार्यात अद्यापही काही ठिकाणी असे अनैतिक प्रकार सुरु असून पोलिसांकडून कारवाईत सातत्य राखण्याचे एक आव्हान निर्माण झाले आहे. कॅफे आणि लॉजवर असे अवैध धंदे सुरु असतानाच सातार्यातील अनेक ठिकाणी घरांमध्येच हा गोरखधंदा सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. पुणे, मुंबई, नाशिक, मिरज आणि कोल्हापूरातून तरुणी व महिला (यातील काही तरुणी तर अल्पवयीनच आहेत) आणून याठिकाणी वेश्या व्यवसाय चालवला जात आहे. सातार्यातील प्रसिद्ध कास पठाराकडील असलेल्या एका हॉटेलमध्ये घडलेल्या रेव्ह पार्टीतील छमछमचे घुंगरु सातारा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी अजून घुटमळत असुन याची सखोल चौकशी होणार का ? अशी विचारणा आता सातारकर करत आहे.
सातार्यातील उच्चभ्रू वसाहतीत असे अवैध धंदे चक्क घरांमध्ये ‘स्पा’ आणि मसाज पार्लरच्या माध्यमातुन सुरु असून याकडे केवळ हप्तेगिरीमुळे पोलीस लक्ष देत नसल्याचा आरोप येथील स्थानिक नागरिक करत आहेत. काही तुटपुंजे पैसे संबंधित मुली वा तरुणीच्या हातावर टेकवून यांच्या ‘अक्का’ मात्र अलिशान गाड्यांमधून फिरताना दिसत आहेत.
काही महिन्यांपूर्वी एका सावत्र आईनेच आपल्या मुलीला केवळ काही पैशांसाठी जबरदस्तीने देहविक्री करण्यास भाग पाडल्याची घटना ताजी असून यातील नराधमास अद्याप अटक झालेली नाही. ही घटना ज्या लॉजवर घडली तिथे देखील अनेक अवैध धंदे कित्येक वर्षांपासून सुरु असल्याचे काही सामाजिक संघटनांनी बोलून दाखविले आहे.
काही महिन्यांपूर्वी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकार्यांनी सातार्यातील एका कॅफेत सुरु असलेले अश्लील चाळे समाजासमोर आणल्यानंतर अखेर त्या कॅफेत केवळ हप्ते घेण्यासाठी जाणार्या पोलिसांना तिथे कारवाई करत गुन्हा दाखल करणे क्रमप्राप्त झाले होते. मात्र संबधित कॅफे मालक, चालक आणि कॅफेत रासलीला करण्यासाठी आलेल्या तरुणांवर पोक्सोंंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती.
मागील काही महिन्यांपूर्वी समोर आलेल्या कास रस्त्यावर असलेल्या एका हॉटेल वर सुद्धा बार बालांची छमछम समाजासमोर आलेली आहे. अशी त्या भागातील अनेक हॉटेल्स आणि लॉजेस आहेत कि यामुळे साताऱ्याची संस्कृती बिघडतं चालली आहे. आणि याची पाळेमुळे ही शहरातील मध्यवर्ती भागामध्ये असलेल्या परिसरातील उच्चभ्रु भागापासुन कासपर्यंत पोहचलेली आहेत. असे दबक्या आवाजात नागरिकांची चर्चा आहे.
सातारा शहर आणि उपनगरांमध्ये बाहेरील जिल्ह्यातील मुली-तरुणी आणून त्यांना हॉटेल, लॉज किंवा उच्चभ्रू वसाहतीतील रूममध्ये ठेऊन त्यांचे फोटो एजंट लोकांद्वारे ग्राहकांपर्यंत पोहचविण्यात येत असून डील फायनल झाल्यास ग्राहकाला संबंधित लॉज किंवा रुमवर पाठवून वेश्याव्यवसाय केला जातो. सातार्यात असा व्यवसाय करणारे जाळे सक्रिय असून, दर दोन दिवसाला बाहेरील जिल्ह्यातून वेगवेगळ्या तरुणी आणून त्यांच्यामार्फत हा वेश्याव्यवसाय चालवला जात आहे.सातारा पोलिसांची विभागणी सातारा शहर, शाहूपुरी आणि तालुका पोलीस स्टेशन अशा तीन पोलीस ठाण्यात झाली असून या हद्दीत वेश्याव्यवसाय चालवणार्यांनी आपले बस्तान चक्क शहर आणि उच्चभ्रू वस्तींमध्ये बसवले आहे. पुणे, मुंबई, नाशिक, मिरज आणि कोल्हापूरहुन तरुणी व महिला आणून त्यांना देहविक्रीसाठी हॉटेल, लॉज, कॅफे आणि बंगल्यांमध्ये पुरविण्यात येत आहे. सातार्यात चाललेल्या या वेश्याव्यवसायाचा ठावठिकाणा पोलिसांनादेखील माहिती असून लक्ष्मी कृपा होत असल्याने संबंधित ठिकाणी पेट्रोलिंग केले जात नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. संबंधित व्यवसाय चालवणार्यांना परिसरातील सामान्य नागरिकांनी हटकले असता पदरी असलेल्या गुंडांकडून तसेच विनयभंगाची भीती दाखवून त्यांच्यावरच अरेरावीची भाषा करून आमचे पोलिसांशी चांगले संबंध असून कायद्यात अडकवण्याची भाषा हे महाभाग करीत आहेत.
पोलिसांशीच चांगले संबंध असल्याची बतावणी केल्यामुळे सामान्यांचीही कोंडी होत आहे. हे व्यावसायिक देखील चांगलेच तरबेज असून त्यांनी कुंटणखान्याची व्याख्या बदलली असल्याचे समोर येत आहे. बाहेरून मुली आणून ग्राहकांना मोबाईलवर फोटो पाठवून डील फायनल झाल्यास त्यांना लॉजेसवर वा इतरही काही ठिकाणी पाठविण्यात संबंधित लोक आघाडीवर असून तरुणी आणि महिलांना देह व्यापार करण्यास भाग पडून स्वतःचा आर्थिक फायदा करून घेत आहेत. तसेच अधिकाधिक ग्राहक मिळविण्यासाठी त्यांचे एजंट देखील मार्केटमध्ये सक्रिय आहेत.पोलीस अधीक्षक समीर शेख सातार्यात रुजू झाल्यापासून मात्र, अवैध धंदेवाल्यांचा बिमोड करण्याच्या सुचना त्यांनी पोलीस ठाण्यांच्या कारभार्यांना दिल्या आहेत. काही समाधानकारक कारवाया होत असताना दिसून देखील येत आहेत. मात्र, सातार्यातील काही एजंट हे महिला आणि तरुणींना प्रलोभने वा काही वेळेस दमदाटी करुन देहव्यापार करायला लावून स्वतःचा आर्थिक फायदा करुन घेत आहेत. असे प्रकार करणार्या नराधमांना ठेचण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे असणार आहे. या आव्हानाचा सामना करीत असताना त्यांनी कोणतीही भीडभाड न बाळगता अशा समाजविघातक प्रवृत्तींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी सातार्यातील शांतताप्रिय नागरिक करीत आहेत.
