सातारा : जमीन विकण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना सदर बाजार येथील म्हाडा कार्यालयातील वरिष्ठ लिपिक मनोज कुमार दशरथ माने याला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. माने याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये 1988 कलम सात नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

तक्रारदार हे शेतकरी असून त्यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे सातारा रोड, तालुका कोरेगाव येथे म्हाडा वसाहतीत प्लॉट घेऊन ठेवला होता. हा प्लॉट विकण्यासाठी त्यांना ना-हरकत प्रमाणपत्राची गरज होती. त्यासाठी त्यांनी म्हाडा कार्यालयात अर्ज केला होता. ना-हरकत प्रमाणपत्रासाठी येथील वरिष्ठ लिपिक मनोज दशरथ माने याने तक्रारदाराकडे 22 जुलै 2024 रोजी सात हजार रुपये लाच मागितली व दाखला देण्यासाठी त्याने दोन महिने अळमटळम केली. तडजोडीअंती 4000 रुपये रक्कम देण्याचे तक्रारदाराने मान्य करून एसीबीकडे तक्रार अर्ज दिला.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्याकडे ही तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलीस निरीक्षक सचिन राऊत, पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले, पोलीस हवालदार गणेश साठे, पोलीस हवालदार निलेश चव्हाण या पथकाने कार्यालय परिसरात सापळा रचून लाच घेताना माने याला रंगेहाथ पकडले.

By Admin

You cannot copy content of this page