
सातारा : अखिल महाराष्ट्र राज्य शैक्षणिक कलाशिक्षक संघाचे दुसरे राज्यस्तरीय अधिवेशन 8 व 9 फेब्रुवारी रोजी सोलापुरात भरत असून सातारा जिल्ह्यातील कला शिक्षकांनी मोठ्या संख्येने या अधिवेशनाला उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपच्या पुणे विभाग शिक्षक आघाडीचे सह संयोजक सुधीर विसापुरे यांनी केले आहे.
या अधिवेशनाचे उद्घाटन 8 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते होणार आहे. वैकुंठवासी दिगंबर महाराज वारकरी संप्रदाय शिक्षण समितीच्या भक्त निवासात हे अधिवेशन होत आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कलाशिक्षक संघाचे राज्याध्यक्ष शेरशहा डोंगरी हे असतील. यावेळी सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. दोन दिवसीय अधिवेशनामध्ये कला शिक्षकांची भरती पोर्टलनुसार व्हावी, संच मान्यतेत कला शिक्षकांचा उल्लेख असावा, शाळा तिथे कला शिक्षकाची नियुक्ती व्हावी या मागण्या अधिवेशनात करण्यात येणार आहेत. नवीन शैक्षणिक धोरण या विषयावर ज्ञानेश्वर कानडे यांचे व्याख्यान, जेष्ठ कला शिक्षकांना जीवन गौरव तर कला शिक्षकांना आदर्श कला शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यातून जास्तीत जास्त कला शिक्षकांनी या अधिवेशनाला उपस्थित रहावे असे आवाहन सुधीर विसापूरे यांनी केले आहे.
