
सातारा: उंब्रज (ता.सातारा) परिसरात गेल्या अनेकदिवसांपासून सुरू असलेल्या अवैध व्यवसायांविरुद्ध पोलिसांनी कंबर कसली असून, गुरुवारी सायंकाळी मोठी कारवाई करण्यात आली. उंब्रज पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्तरीत्या टाकलेल्या छाप्यात ७ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पोलिसांनी उंब्रज येथील ‘हॉटेल पंचमी’ आणि चोरे रस्त्यावर असलेल्या ‘हॉटेल महेंद्र’ या दोन ठिकाणी अचानक छापे टाकले. या ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी या ठिकाणाहून संशयित ७ व्यक्तींना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
स्थानिक गुन्हे शाखा आणि उंब्रज पोलीस स्टेशनच्या पथकाने ही कारवाई अत्यंत गोपनीय पद्धतीने पार पाडली. गुरुवारी सायंकाळी एकाच वेळी अनेक हॉटेल्सची तपासणी करण्यात आली, ज्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
