सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा लोकसभा मतदारसंघातील विजयाच्या निमित्ताने निघालेल्या सातारा शहरातील रॅलीमध्ये अज्ञात चोरट्याने दहा तोळे दागिन्यावर डल्ला मारला. दोन घटनांमध्ये तब्बल साडेपाच लाख रुपयांचा ऐवज गेल्याची चर्चा आहे. या संदर्भात अजूनही काही राजे समर्थकांच्या तक्रारी दाखल होत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

याबाबत शहर पोलीस ठाण्यामध्ये दोन तक्रारी दाखल झालेल्या आहेत. उदयनराजे भोसले यांच्या विजयानंतर राजे समर्थकांनी जलमंदिर ते पोवई नाका व तेथून वखारमहामंडळाच्या मतमोजणी केंद्रापर्यंत रॅली काढली होती. या रॅलीमध्ये 5 हजारांपेक्षा अधिक समर्थकांचा समावेश होता. या गर्दीचा गैरफायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी दोनइसमांचे आठ तोळे वजनाच्या सोन्याच्या चैन लांबवल्याचे समोर आले आहे.

पहिल्या घटनेमध्ये अमर संजय जाधव वय 27 राहणार तांगडे वस्ती, कोडोली हे देगाव फाटा चौकातील रॅली सहभागी झाले होते. त्यांच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याची सोन्याची चैन अज्ञाताने लांबवली. हा प्रकार देगाव फाटा चौक परिसरात साडेतीन वाजता घडला. रॅली संपल्यानंतर आपल्या गळ्यात सोन्याची चैन नसल्याचे जाधव यांच्या लक्षात आले, तर दुसऱ्या एका घटनेमध्ये शिवतीर्थ पोवई नाका येथे नरेश सिताराम अग्रवाल वय 47 राहणार कराड यांच्या गळ्यातील साडेचार तोळे वजनाची सोन्याची चैन अज्ञाताने लांबवली. या दोन्ही घटनांची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.

यासारख्या अजूनही दोन-चार घटना घडल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र याबाबत अद्यापही तक्रारी दाखल झालेल्या नाहीत. या घटनांची दखल घेऊन सातारा शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक तपासाच्या दृष्टीने सक्रिय झाले आहे. त्याअनुषंगाने उदयनराजे यांच्या रॅलीच्या सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्याच्या कामाने वेग घेतला आहे.

By Admin

You cannot copy content of this page