सातारा : (राजमुद्रा न्युज वृत्तसेवा) : कोंडवे ता.सातारा येथील जामा मस्जिदमध्ये बकरी ईद सणानिमित्त मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन सण उत्साहात साजरा केला. यावेळी सातारा तालुक्याचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे व त्यांच्या पोलीसांनी मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मुस्लिम समाजाच्यावतीने पोलीस बांधवांना शिरखुर्माचे वाटप करण्यात आले.

यावेळी पोनि निलेश तांबे म्हणाले, बकरी ईद हा एक मुस्लिम धर्मातील दुसरा पवित्र सण आहे. या सणा दिवशी बकऱ्यांची कुर्बानी देऊन मुस्लिम बांधवांकडून दानधर्म करीत पुण्याचे काम केले जाते. अखिल मानव जातीचा ईश्वर एकच असून तो सृष्टीचा पालन व तारणहार असतो. येथील हिंदू-मुस्लिम बांधवांमध्ये असलेला एकोपा हे ऐक्याचे प्रतीक असून जातीय सलोखा राखण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने आवश्यक ते सहकार्यही केले जाईल.

बकरी ईद सणानिमित्त पोनि निलेश तांबे यांनी मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या.

दरम्यान तंटामुक्त गाव व हिंदू-मुस्लिमांमधील एकोपा याबद्दल पोलीस हवालदार उमेश माने यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जामा मशीदमध्ये मुस्लिम बांधव व नातेवाईक एकत्र येऊन ईद मुबारक करीत गळाभेट घेतली. मस्जिदमधील मुस्लिम बांधवांच्या नमाज पठणानंतर समाजाने घरोघरी बकऱ्यांची कुर्बानी दिली.

यावेळी निवृत्त पोलीस अधिकारी लतीफ शेख, एपीआय मोहसीन पठाण, मौलाना कमृद्दिन सय्यद, माजी उपसरपंच जावेद पठाण, शमशुद्दीन सय्यद, फिरोज पठाण, फारुख खान, आरिफ खान, आसिफ सय्यद,पोलीस नाईक महेंद्र नारनवर, धोंडीराम हंकारे, धीरज पारडे, पोलीस पाटील बाबुराव गायकवाड उपस्थित होते.

By Admin

You cannot copy content of this page