सातारा : सातारा जिल्ह्यात पारंपारिकपध्दतीने वटपौर्णिमा उत्साहात साजरीकरण्यात आली. सातारा शहर व परिसरात हिंदू संस्कृतीनुसार महिलांनी पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत ठेवून जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे, अशी प्रार्थना करून वटवृक्षाची पूजा करत वटपौर्णिमेचा सण साजरा केला.फळ बाजारात या निमित्ताने मोठी उलाढाल झाली.

सावित्रीने यमाकडून पतीचे प्राण आणल्याची पुराणात कथा आहे. आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे, ही या वटपौर्णिमा व्रत करण्यामागील श्रद्धा आहे. हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ मासातील पौर्णिमा तिथीला वटसावित्री पौर्णिमा साजरी केली जाते. सकाळपासूनच सातारा शहरात वडाची पूजा करण्यासाठी हळद-कुंकू, ओटी, बांगडी, वस्त्रमाळ, आंबे,वस्त्र आदी वस्तू खरेदीसाठी महिलांची गर्दी दिसत होती. हिरवा शालू, पैठणी, नाकात नथ, हिरवा चुडा, सिंदूर अशा सौभाग्य लेण्यांनी सजून महिलांनी वटवृक्षाची पूजा करुन वडाला फेरे घालताना पतीला आरोग्यसंपन्न, दीर्घायुष्य लाभू दे, अशी प्रार्थना केली.

गोडोली, महादरे, मोरे कॉलनी भुरके कॉलनी, पोलीस मुख्यालय परिसर, प्रतापगंजपेठ, मंगळाई कॉलनी, जगतापवाडी,पिरवाडी, निसर्ग कॉलनी इ भागांमध्ये वडाला फेऱ्या मारून सुवासिनींनी आपल्या साताजन्माच्या मनोकामना प्रकट केल्या सुवासिनींनी एकमेकींना हळदी- कुंकू लावूनहा सण साजरा केला. अनेक महिलांनी यंदा घरीच हा सण साजरा केला. फळ बाजारात मंगळवारी मोठी उलाढाल झाली.

सातारा शहर व परिसरात ग्रामीण भागात आज दुपारपासूनच सुवासिनी वडाची पूजा करण्यासाठी जात होत्या. सातारा येथे पोलीस मुख्यालयातील महिला कर्मचाऱ्यांनी पोलीस वसाहतीत असलेल्या वडाच्या झाडाला फेऱ्या मारुन पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.

By Admin

You cannot copy content of this page