सातारा (प्रतिनिधी): स्त्री शक्ती एकवटली तर काय होवू शकतो, याचा प्रत्यय फलटण तालुक्यातील आळजापूर गावात आला आहे. गाव व गावच्या हद्दीत दारुबंदी व्हावी, यासाठी गावातील सर्व महिला आणि त्यांना गावातील जागरुक पुरुष मंडळींनी पाठींबा दिला आहे. दारुबंदीसाठी मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून गावातील प्रमुख मंडळींनीही मी दारु पिणार नाही, कोणाला पाजणार नाही, अन गावच्या हद्दीत अवैध, वैध दारु व्यवसाय चालू देणार नाही, अशी शपथ घेतली आहे. त्यामुळे आता दारुबंदीसाठी प्रशासकीय यंत्रणाही अलर्ट होत गतीमान झाली आहे.

आळजापूर ता. फलटण येथील महिलांनी दारुबंदीसाठी एल्गार पुकारला आहे. यानंतर गावातील दारु पिणाऱ्यांची संख्या कायमची बंद व्हावी, यासाठी गावातील जागरुक पुरुष मंडळींनीही महिलांच्या या भूमिकेचे समर्थन केले आहे. दारुबंदीसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. ही सभा सरपंच शुभम नलवडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ग्रामसेवक साप्ते तसेच दारुबंदीसाठी गेल्या २५ वर्षापासून लढा देणारे समाजसेवक नितीन नलवडे व त्यांचे सहकारी मित्र तसेच जागृत ग्रामस्थ उपस्थित होते.

कुटुंबातील कर्ता पुरुष जेव्हा दारुच्या आहारी जातो. तेव्हा ते संपूर्ण कुटुंब उध्दवस्त होते. व्यसनाधीनतेमुळे अनेक संसार उघड्यावर पडले आहेत. घरातील पुरुष दारु पितो, तेव्हा त्या कुटुंबातील महिला संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेत असतात. दिवसभर काबाडकष्ट करुन सायंकाळी घरी आल्यानंतर दारु पिणाऱ्या नवऱ्याची शिवीगाळ आणि मारही पत्नीला खावा लागतो. याच गोष्टींना कंटाळून गावातील सर्व महिला एकवटल्या अन त्यांनी दारुबंदीचा एल्गार केला आहे. गावच्या ग्रामसभेत काही महिलांनी संतप्त होत तर काही महिलांनी दारुमुळे उध्दवस्त झालेल्या संसाराची ह्रदयस्पर्शी भावना व्यक्त केल्या. दरम्यान, दारु विक्री करणाऱ्यावर आणि दारु पिणाऱ्यांना जाहीर समज ही या ग्रामसभेत देताना महिला संतप्त झाल्या. आता आम्ही आमच्या गावात आम्ही शासन, असा नारा देत महिलांनी आपला रुद्रावतार दाखवून दिला.

अलिकडच्या काही महिन्यात दारु पिण्यामुळे दहा ते बारा जणांना जगाचा निरोप घ्यावा लागला आहे. कुटुंबातील कर्त्या पुरुषांचा आधार गेल्यामुळे आज जी वाताहत सुरु आहे. त्याबाबत काही महिलांनी आपल्या शब्दात तीव्र भावना व्यक्त केल्या. आपल्या कुटुंबात जे वाट्याला आले आहे. ते यापुढे गावातील इतर कोणाच्याही येवू नये, यासाठी हा लढा व्यक्तीच्या विरोधात नसून चूकीच्या व्यवस्थेविरुध्द देत असल्याच्या भावना यावेळी काहींनी संतप्त होत तर काहींनी ह्रदयस्पर्शी होत आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस तैनात ठेण्यात आला होता.या ग्रामसभेचे प्रोसिडींग दिल्यानंतर आता शासनाच्या दरबारात देण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनानेही अलर्ट होत आळजापूर येथील ग्रामस्थांच्या भावनांचा आदर करत सर्व यंत्रणा लवकरात लवकर गतीमान करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

दारु दुकानाच्या विरोधात महिला संतप्त

आळजापूर गावच्या हद्दीत कापशी येथील वास्तव्यास असणाऱ्या एकाने आपल्या जागेचा एनए प्लॉट करुन संबंधित जागेवर हॉटेल व्यवसाय सुरु केला आहे. आता तिथे परमीट बारसाठी परवाना मिळावा म्हणून ग्रामपंचयातीचा मालमत्ता करचा उतारा घेत काही दिवसांपूर्वी या हॉटेल व्यावसायिकाने शासनाकडे प्रस्ताव दिला होता. तो मंजूर झाल्याची कानकुन महिलांना लागताच संतप्त झालेल्या महिलांनी एकत्रित येत या दारु दुकानाविरोधात तीव्र लढा देण्यासाठी एकवटल्यानंतर निर्धार केला आहे.

दारुसाठी शेतजमिनी विकल्या..!

आळजापूर, कापशी, बिबी परिसरातील गावात दारुच्या व्यसनापायी अनेकांना जमीनी विकाव्या लागल्या. तर काही दारु विक्रेत्यांनी त्यांना जमिनी कवडीमोलाने देण्यास भाग पाडले. यामध्ये काहीजण भूमीहीन झाले आहेत. हे सर्वांना ज्ञात आहे. पण तरीही आजची विशेषत: शाळकरी नवोदीत पिढी या दारुच्या व्यसनात अडकत चालली आहे. यांच अंधारमय होवू लागणार भविष्य वाचवायचं असेल तर आता आळजापुरच नव्हे तर कापशीसह सर्वच गावातील महिलांनी आळजापुर येथील महिलांना भेटून व मोबाईलद्वारे पाठींबा व्यक्त केला आहे. आजची पिढी या दारुच्या व्यसनातून बाहेर पडली तरच उर्वरीत शेतजमिनी राहणार आहेत, अशा ह्रदयस्पर्शी भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केल्या. याचा आदर तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी करावा, अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली.

By Admin

You cannot copy content of this page