सातारा : सातारा शहरात पडलेल्या खड्ड्यांमध्ये मंगळवारी चक्क गोट्यांचा डाव रंगला. दलित पँथर सातारा यांच्यावतीने शहरातील ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांचा निषेध या अभिनव आंदोलनाद्वारे करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच सातारा नगरपालिका या दोन्ही आस्थापनांचा निषेध करण्यात आला. खड्ड्यात गोट्या खेळून करण्यात आलेल्या आंदोलनाची आज सातारा शहरात जोरदार चर्चा होती.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी 15 ऑगस्ट नंतर सातार्‍यात एकही खड्डा दिसणार नाही, असे आश्वासन दिले होते. खड्डे भरले न गेल्यास ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात सातार्‍यातील रस्त्यांची प्रचंड दुरावस्था आहे. या घटनांचा निषेध म्हणून दलित पँथर सेनेने आज अभिनव मार्ग स्वीकारला. येथील यशवंतराव चव्हाण सायन्स महाविद्यालयाच्या समोरील रस्त्यावर दलित पँथर सेनेच्या वतीने चक्क गोट्यांचा डाव खड्ड्यांमध्ये रंगवण्यात आला.

तसेच फलक झळकावून सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपालिका यांचा निषेध करण्यात आला. सातार्‍यात खड्डे पडले आहेत याची जाणीव सार्वजनिक बांधकाम विभागाला व्हावी याकरता हा डाव रंगवण्यात आल्याची माहिती दलित पँथर सेनेच्या सूत्रांनी दिली आहे.

By Admin

You cannot copy content of this page